Deenanath Mangeshkar | पुण्यातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारासाठी वेळेत निर्णय न घेतल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बाळंतपणासाठी २० लाखांची मागणी केल्याने उपचारात विलंब झाला आणि तनिषा यांचा मृत्यू झाला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पैशांची अट टाकून उपचारास विलंब
तनिषा भिसे या प्रसूतीसाठी पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र रुग्णालय (Deenanath Mangeshkar) प्रशासनाने सुरुवातीलाच कुटुंबीयांना बाळंतपणासाठी २० लाख रुपये लागतील, अशी अट घातली. यापैकी तातडीने १० लाख रुपये भरण्याची सक्त सूचना करण्यात आली. भिसे कुटुंबाकडून तातडीने ३ लाखांची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवण्यात आली. पण रुग्णालयाने ही रक्कम अपुरी मानत उपचार सुरू करण्यास नकार दिला.
या विलंबामुळे तनिषा यांच्या प्रकृतीत (Deenanath Mangeshkar) अधिक बिघाड झाला. त्यानंतर तब्बल तीन तासांनी त्यांना वाकड येथील सूर्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र त्यांचा चेहरा पाहण्यापूर्वीच तनिषा यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक असून, आर्थिक अडचणीपायी एका सुदृढ मातेला आपला जीव गमवावा लागल्याने समाजमन संतप्त झाले आहे.
कुटुंबाचा आठ वर्षांचा स्वप्नभंग
सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे (Amit Gorkhe) यांचे स्वीय सहायक असून, त्यांची तनिषा यांच्यासोबत आठ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्या काळात दोघांनी प्रेमविवाह केला आणि तनिषा यांनी शिक्षिका पदाचा राजीनामा देत संसाराला प्राधान्य दिलं. सुशांत भिसे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, सामर्थ्य प्रबोधिनी या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांना आरोग्यदूत पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्यांच्या आयुष्यात पालकत्वाचं सुख येत होतं. तनिषा यांनी सातव्या महिन्यात जुळ्या मुलींचा जन्म दिला. एक बाळ १.१२२ किलो तर दुसरं ६४० ग्रॅम वजनाचं असून, सुरुवातीला एक बाळ व्हेंटिलेटरवर होतं. आता दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र तनिषा यांची अनुपस्थिती हा कधीही न भरून निघणारा आघात आहे.






