Dattatray Gade | स्वारगेट (Swargate) बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. चार दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते, अखेर तो गुनाट (Gunat) गावात सापडला.
दोन तास घटनास्थळीच फिरत होता-
स्वारगेट (Swargate) बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासणीतून समोर आले की, आरोपी अत्याचारानंतर दोन तास घटनास्थळीच बसस्थानकात फिरत होता. इतकेच नव्हे, तर तो पुन्हा दुसऱ्या तरुणीच्या शोधात असल्याचेही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.
दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने पहाटेच पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बसमध्ये लैंगिक अत्याचार केला. मात्र, त्यानंतर तो लगेच पळून गेला नाही. दोन तास तो स्वारगेट बसस्थानकातच फिरत राहिला. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांना हे लक्षात आले आणि त्यानंतर त्याच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.
गावी जाऊन लपला-
आरोपी गुनाट (Gunat) गावात जाऊन लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, त्याचा मोबाईल बंद असल्याने लोकेशन ट्रॅक करणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी गावातील नागरिकांकडून माहिती घेत आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
दिवसभर पोलिसांनी शेतात शोधमोहीम राबवली. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला, पण पहिल्यांदा त्याचा मागमूस लागत नव्हता. मात्र, पोलिसांनी आपला शोध सुरूच ठेवला. रात्री उशीरा (Dattatray Gade) आरोपी एका नातेवाईकाच्या घरी गेला आणि त्याने खायला मागितले.
रात्री दीड वाजता अटक-
यावेळी नातेवाईकांनी त्याला अन्न न देता फक्त पाण्याची बाटली दिली. आरोपीने आपली चूक मान्य करत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. नातेवाईकांनी लगेच पोलिसांना कळवले आणि शेवटी रात्री दीड वाजता पोलिसांनी त्याला शेतात अटक केली. आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असून, घटनेनंतर तो गावात पळून गेला होता. तो गावाजवळील उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली.






