Dasara Melava 2025 | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाचे दसरा मेळावे नेहमीच गाजले आहेत, मात्र यंदाचा दसरा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ ठरणार असल्याचे संकेत ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, यंदा या व्यासपीठावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे.
सचिन अहिरांचा मोठा संकेत :
सचिन अहिर यांनी बोलताना म्हटलं आहे की, “दसऱ्याला चांगली बातमी मिळेल. कदाचित उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांनाही आमंत्रण दिलं जाऊ शकतं. ते आले तर स्टेजवर दोन्ही भाऊ एकत्र दिसू शकतात.”
त्यांनी स्पष्ट केलं की, पक्षाचं आणि आघाडीचं व्यासपीठ वेगळं असलं तरी यंदाचा मेळावा हा ऐतिहासिक ठरणार आहे.
Dasara Melava 2025 | ‘मराठी माणसासाठी अस्तित्वाची लढाई’ :
अहिर पुढे म्हणाले की, मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई ठरेल. “उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. ही केवळ दोन पक्षांची नाही तर राज्याच्या भविष्यासाठीची गरज आहे,” असं ते म्हणाले.
दसरा मेळावा हा फक्त राजकीय नसून कार्यकर्त्यांना दिशा देणारा आणि मराठी जनतेसाठी प्रेरणादायी असतो. यावेळी उद्धव ठाकरे सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणार आहेत. जर राज ठाकरे याही व्यासपीठावर आले, तर ते महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं टर्निंग पॉइंट ठरू शकतं.






