Dahisar Toll Plaza | मुंबई महानगरात वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. दररोज लाखो वाहनधारकांना दहिसर टोलनाक्यावर (Dahisar Toll Plaza) मोठ्या रांगा व वेळेचा अपव्यय सहन करावा लागतो. मात्र, आता हा प्रश्न कायमचा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) सादर केला आहे.
स्थलांतराची नवी जागा :
या प्रस्तावानुसार दहिसर टोलनाका (Dahisar Toll Plaza) सध्याच्या ठिकाणावरून हलवून वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत, वर्सोवा उड्डाणपुलापूर्वी मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad highway) महामार्गावर नेण्यात येणार आहे. यामुळे मिरा-भाईंदर, वसई, विरार, पालघर आणि गुजरातहून येणाऱ्या वाहनांना लागणारी कोंडी कमी होईल. स्थानिक भागातील शहरी वाहतुकीचा ताणही टोल नाक्यावर पडणार नाही, असे या प्रस्तावात नमूद आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा टोलनाका स्थलांतरित करण्याची मागणी सुरू होती. स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही ही मागणी सातत्याने केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबतचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. (Mumbai traffic jam solution)
११ सप्टेंबर रोजी एमएसआरडीसी, एनएचएआय आणि पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांनी अधिकृत प्रस्ताव एनएचएआयकडे सादर केला.
Dahisar Toll Plaza | फास्ट टॅग व नवे तंत्रज्ञान :
या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे की, फास्ट टॅग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टोल वसुली अधिक वेगवान केली जाईल. त्यामुळे भविष्यात टोलनाक्यावर रांगा लागू नयेत याची काळजी घेतली जाणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचीही भेट घेतली असून, टोलनाका स्थलांतरित करण्याच्या कार्यवाहीसाठी तातडीने निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे. एनएचएआयने परवानगी दिल्यानंतर लवकरच या योजनेवर अंमलबजावणी होणार आहे.






