Cyclone Montha | दिवाळी संपून १ नोव्हेंबर उजाडला तरी राज्यात पावसाचा जोर कायम आहे. ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने थैमान घातले असून, अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका बळीराजाला बसला असून, शेतकरी चिंतेत बुडाला आहे.
पुढील २४ तास हाय अलर्ट, ‘मोंथा’चा प्रभाव :
बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ (Montha) चक्रीवादळाचा प्रभाव अद्याप कायम असून, त्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात हवामान अस्थिर आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई (Mumbai), कोकण (Konkan), नाशिक (Nashik), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), अहिल्यानगर, रायगड (Raigad), सिंधुदुर्ग (Sindhudurg), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवत ‘यलो’ आणि ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
पुढील एक ते दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे. मुंबईत (Mumbai) रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातही (Marathwada) विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे आणि सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Cyclone Montha | बळीराजा संकटात: पिकांना फुटले अंकुर, मदतही मिळेना :
या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच अतिवृष्टी आणि रोगकिडीने त्रस्त असलेला शेतकरी आता या पावसामुळे पूर्णपणे हतबल झाला आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्यात कापणी करून शेतात ठेवलेल्या धानाला (Paddy) अक्षरशः अंकुर फुटले आहेत. शेतकऱ्यांची उभी पिके आणि कापणी केलेले धान्य पाण्यात गेल्याने त्यांचे स्वप्न डोळ्यादेखत वाहून गेले आहे.
दुसरीकडे, जालना (Jalna) जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. यापूर्वीच्या अतिवृष्टी अनुदानाची मदत दिवाळीनंतरही खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना मोठा फटका बसूनही मदतीचा एकही रुपया न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.






