‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

On: May 16, 2025 7:49 AM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Rain Update | चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे मुंबई आणि रायगडसह राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा (Rain Update) देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या ‘शक्ती’ नावाच्या चक्रीवादळामुळे वाऱ्याची दिशा बदलली आहे आणि त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर दिसून येत आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात पूर्वमोसमी वारे आणि वादळी पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

वादळी पावसाची शक्यता

पुढील ४८ तासांसाठी, म्हणजेच १८ मे पर्यंत रायगड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता (Rain Update) हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा, मोबाईलचा वापर टाळण्याचा आणि इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

यावर्षी मे महिन्यात उन्हाळ्याऐवजी अवकाळी पावसाने राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील किमान तीन ते चार आठवडे राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मान्सून राज्यात दाखल होईपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचे वातावरण कायम राहू शकते, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निरीक्षणांनुसार, राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, वाऱ्याचा वेगही अधिक असणार आहे. त्यामुळे १५ ते २२ मे दरम्यान राज्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.

Rain Update | हवामान विभागाचा इशारा

सध्या अरबी समुद्रासह तेलंगणा राज्यापर्यंत वाऱ्यांची चक्राकार गती पाहता, राज्यात वळवाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या पावसाचा फटका सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना बसू शकतो. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडू शकतात किंवा इतर नुकसान होऊ शकते, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे महत्त्वाचे आहे.

News Title- Cyclone Alert: Stormy Rain Warning in Mumbai, Raigad and Other Parts; Dark Clouds Expected

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now