Nano Banana Trend | सोशल मीडियावर नवनवीन AI फोटो टूल्स तरुणाईला मोहात पाडत आहेत. काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या ‘Ghibli ट्रेंड’ नंतर आता ‘Nano Banana’ ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. या ट्रेंडमध्ये वापरकर्ते स्वतःचे हटके, 3D मॉडेलसारखे फोटो तयार करून व्हायरल करत आहेत. मात्र या मजेदार दिसणाऱ्या टूलमागे मोठा सायबर धोका दडलेला असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.
कसा आहे धोका? :
सायबर अवेअरनेस फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सायबर क्राईम एक्सपर्ट धनंजय देशपांडे यांनी या ट्रेंडबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘Nano Banana’ टूल वापरताना मोबाईल गॅलरी, ईमेल अशा अनेक परवानग्या द्याव्या लागतात. यामुळे तुमची खासगी गॅलरी, फोटो, ईमेल डाटा थेट त्यांच्या सर्व्हरवर पोहोचतो. (Nano Banana Trend)
तसेच एकदा तुमची गॅलरी हॅकर्सच्या ताब्यात गेली तर फोटो लीक होणे, मॉर्फिंग, ब्लॅकमेलिंग यांसारखे गंभीर धोके संभवतात. देशपांडे यांच्या मते, याआधीच्या Ghibli ट्रेंडमध्येही अनेकांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. अगदी तसाच धोका या नव्या ट्रेंडमध्येही आहे.
Nano Banana Trend | ब्लॅकमेलिंगचा धोका वाढतोय :
हॅकर्स तुमचे फोटो हाताळून ते अश्लील किंवा फेक स्वरूपात बदलू शकतात, आणि मग पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करू शकतात. यामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रासही सहन करावा लागू शकतो.
नागरिकांसाठी सल्ला :
– अशा व्हायरल ट्रेंडमध्ये अडकू नका.
– कोणतेही थर्ड-पार्टी टूल्स किंवा अॅप्स डाउनलोड करण्यापूर्वी त्यांचा स्त्रोत तपासा.
– तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही या धोक्यांबाबत जागरूक करा.
– अनोळखी अॅप्सना गॅलरी किंवा ईमेल अॅक्सेस देणे टाळा. (Nano Banana Trend)
‘Nano Banana’ सारखे ट्रेंड आकर्षक वाटले तरी त्यामागे सायबर गुन्हेगारांचे जाळे असू शकते. त्यामुळे मनोरंजनासाठी सुरक्षेचा बळी देऊ नका, असा स्पष्ट इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.






