Ambati Rayudu | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण (India Pakistan tension) परिस्थितीत, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणारे समर्थन जगजाहीर आहे. याच कारणामुळे पाकिस्तानने भारतावर युद्ध पुकारले आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कठोर कारवाई करण्याचा निर्धार केला होता.
भारताने १५ दिवसांनंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ले सुरू केले, ज्याला भारताने प्रभावीपणे तोंड दिले. अशा परिस्थितीत, प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या सैन्यदलाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असताना, माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने केलेली एक पोस्ट वादग्रस्त ठरली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
अंबाती रायुडूची पोस्ट
अंबाती रायुडूने ही पोस्ट त्यावेळी केली, जेव्हा पाकिस्तान भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत होता. यामुळे अनेक भारतीयांचा संयम सुटला, कारण आपले सैन्य जवान नागरी वस्त्यांवरील हल्ले परतवून लावण्यासाठी जीवावर उदार झाले होते.
अंबाती रायुडूने एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना लिहिले की, “डोळ्याच्या बदल्यात डोळा घेतल्याने संपूर्ण जग आंधळे होते.” या विधानामुळे अनेकांचा पारा चढला. एका वापरकर्त्याने या पोस्टला उत्तर देत तातडीने डिलीट करण्याची मागणी केली, तर दुसऱ्या युजरने टिप्पणी केली की, असा विचार केल्यास आपण दोन्ही डोळे गमावून बसू.
वाढता वाद पाहून अंबाती रायुडूने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याने दुसरी पोस्ट करत लिहिले की, “जम्मू-काश्मीर, पंजाब आणि भारतीय सीमेच्या इतर भागांतील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी प्रार्थना. प्रभावित झालेल्या प्रत्येकासाठी सुरक्षितता, ताकद आणि जलद निराकरणाची आशा आहे. जय हिंद (Jai Hind).” भारत आतापर्यंत केवळ प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे आणि ही लढाई दहशतवादाविरोधात असल्याचे अनेक देशांना पटवून दिले आहे. मात्र, पाकिस्तानला दहशतवादाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, त्यामुळे ते अशा कृत्यांद्वारे दहशतवादाला खतपाणी घालत आहेत.






