COVID-19 रुग्ण वाढले; जाणून घ्या महाराष्ट्रासह भारतात परिस्थिती काय?

On: May 22, 2025 5:31 PM
COVID Update
---Advertisement---

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले होते. सध्या पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव हळूहळू डोकं वर काढतोय. मुंबईसारख्या मोठ्या शहरात पुन्हा कोविड-१९ चे रुग्ण वाढू लागले आहेत. बीएमसीने याकडे वेळीच लक्ष दिलं असून खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्ण वाढले

मुंबईत (Mumbai) फार कमी रुग्ण होते. मार्चमध्ये एकही रुग्ण सापडला नव्हता, पण एप्रिलमध्ये चार आणि मे महिन्यात थेट १२० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे परिस्थितीकडे गांभीर्यानं पाहण्याची वेळ आली आहे. बीएमसीने आता केवळ कोविडच नव्हे तर आयएलआय (सर्दी, खोकला यासारखे आजार) आणि एसएआरआय (गंभीर श्वसन रोग) यावरही लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.

संशयित रुग्णांची चाचणी करून त्यांना योग्य उपचार देण्यात येत आहेत. याशिवाय, ज्या रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत, त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. यामुळे विषाणूचा प्रकार, त्यात होत असलेले बदल आणि त्याचा फैलाव कसा होतो हे कळू शकतं. महाराष्ट्रात हे नमुने पुण्यातील NIV आणि बी.जे. मेडिकल कॉलेजला तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

जीनोमिक तपासणीत काही रुग्णांना कोविडसोबतच एच३ एन२ आणि इतर श्वसन संसर्गाचा त्रास असल्याचं आढळून आलं आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे आणखी चिंता वाढली आहे.

COVID-19 | ‘या’ राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढले 

देशपातळीवरही परिस्थिती हलकीशी बदलत आहे. १९ मे २०२५ रोजीपर्यंत देशभरात २५७ सक्रिय कोविड रुग्ण नोंदले गेले. केरळमध्ये सर्वाधिक ६९, महाराष्ट्रात ४४ (Maharashtra) आणि तामिळनाडूत ३४ रुग्ण सापडले आहेत. सध्या या आकड्यांवरून ही लाट फारशी गंभीर वाटत नाही, पण सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये ओमिक्रॉनचे JN.1 नावाचे नवीन प्रकार फैलावत असल्याने भारतालाही सतर्क राहणं गरजेचं आहे.

बीएमसी आणि आरोग्य विभाग योग्य तयारी करत आहेत. चाचण्या, उपचार, जीनोम सिक्वेन्सिंग आणि मृत्यू प्रकरणांची तपासणी या सर्व गोष्टी सुरू आहेत. आपल्यालाही खबरदारी घ्यावी लागेल. मास्क वापरणं, गर्दी टाळणं आणि आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, संकट कितीही छोटं वाटलं तरी दुर्लक्ष केलं तर ते मोठं होतं हे आपण मागच्या लाटांत पाहिलंच आहे.

Title : COVID-19 patients increase; Know what is the situation in India including Mumbai Maharashtra?

Join WhatsApp Group

Join Now