काँग्रेसची मोठी खेळी! निवडणुकीपूर्वी ‘या’ बड्या पक्षासोबत केली हातमिळवणी

On: December 24, 2025 5:36 PM
Congress RSP alliance
---Advertisement---

Congress RSP alliance | महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेत असतानाच आता काँग्रेसनेही मोठा निर्णय घेतला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने राष्ट्रीय समाज पक्षासोबत (RSP) युती करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (Congress RSP alliance)

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची युती, तर दुसरीकडे महायुतीतील पक्ष एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र अद्याप अनेक ठिकाणी जागावाटप स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस-रासप युतीची घोषणा ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे.

काँग्रेस-रासप युतीची अधिकृत घोषणा :

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. भाजप लोकशाही संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप करत, “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या विचाराने काँग्रेस आणि रासप एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. याआधी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्येही रासपची मदत मिळाल्याचे नमूद करत, भविष्यातही ही युती कायम राहील, असे संकेत काँग्रेसकडून देण्यात आले.

Congress RSP alliance | महादेव जानकर काय म्हणाले? :

काँग्रेससोबतच्या युतीवर प्रतिक्रिया देताना रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadeo jankar) म्हणाले की, देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेससोबत राहणे आवश्यक आहे. “मला काँग्रेसने बोलावले नाही, मी स्वतःहून आलो आहे. देशासाठी आणि लोकशाहीसाठी एकत्र लढण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना जानकर म्हणाले की, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी जे धोरण राबवण्यात आले, तेच धोरण आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही असणार आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते निवडणूक लढवू इच्छित होते. मोठ्या आघाड्यांमुळे अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण

महादेव जानकर यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हटले की, “पूर्वी मुलं पळवणाऱ्या टोळ्यांची चर्चा होती, आता राजकीय पक्ष चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. (Congress RSP alliance)

एकीकडे ठाकरे बंधूंची युती, दुसरीकडे काँग्रेस–रासप आघाडी आणि तिसरीकडे महायुतीची तयारी, यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत. येत्या काळात जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील आघाड्यांमुळे राजकीय समीकरणे आणखी बदलू शकतात.

News Title : Congress RSP Alliance Announced After Thackeray Brothers’ Unity, Maharashtra Municipal Poll Equations to Change

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now