Pune News | पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेवर नियंत्रण नाहीये. त्यामुळे ‘आवो-जावो घर तुम्हारा’ अशी परिस्थिती झाली आहे. वेळेचे काटेकोर पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, पंधरा दिवसांत सुधारणा न झाल्यास थेट विभागप्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. (Pune Mahapalika)
वेळेचे पालन न केल्यामुळे आयुक्त नाराज:
राज्य शासनाने शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतर कामाचे तास वाढविण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेची कार्यालयीन वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित करण्यात आली असून, शिपाई आणि सेवकांना पंधरा मिनिटे अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र, वास्तवात काही मोजक्या शिपायांव्यतिरिक्त कोणीही दहाच्या आधी हजेरी लावत नाही. अनेक अधिकारी व कर्मचारी ११, ११:३० किंवा अगदी १२ वाजल्यानंतर कार्यालयात पोहोचतात. दुपारपासूनच घरी जाणाऱ्यांची गर्दी सुरू होते, अशी स्थिती गेल्या काही महिन्यांपासून कायम आहे.
दोन महिन्यांपूर्वी नागरिकांनी ह्या शिस्तभंगतेवर तक्रार केली होती, ज्यामुळे काही दिवसांपुरते कर्मचाऱ्यांनी शिस्त पाळल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर पुन्हा जुन्याच सवयी सुरू झाल्या. आयुक्तांनी आता स्पष्ट केले आहे की, जर पंधरा दिवसांत बदल दिसून आला नाही, तर विभागप्रमुखांनाच जबाबदार धरले जाईल.
Pune News | हजेरी यंत्रणा बंद, शिस्तीचा बोजवारा:
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बसविण्यात आलेली हजेरी यंत्रणा मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. संबंधित निविदा संपल्यामुळे ही यंत्रणा नव्याने सुरु करण्यात आलेली नाही. परिणामी, अधिकारी आणि कर्मचारी केव्हा येतात, केव्हा जातात, याचा ठावठिकाणा राहत नाही. (Pune Mahapalika)
विभागप्रमुखांची जबाबदारी असूनही अनेक प्रमुख स्वतःच वेळेवर कार्यालयात उपस्थित नसल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे कामकाजावर परिणाम होतो आणि नागरिकांच्या तक्रारी वाढतात. हजेरी व्यवस्थेअभावी गैरहजेरी व विलंब यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.
आयुक्त नवल किशोर राम यांनी या स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पंधरा दिवसांच्या आत वेळेचे पालन होत नसल्यास विभागप्रमुखांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यामुळे येत्या काळात महापालिकेत शिस्त पुन्हा प्रस्थापित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






