Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आयुक्त नवलकिशोर राम यांनी कंबर कसली आहे. महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांतील सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि अभियंते यांच्या निष्क्रियतेकडे आयुक्तांनी गांभीर्याने पाहिले असून, कामात सुधारणा न झाल्यास बदली किंवा शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्वच्छता, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, रस्त्यांची दुरुस्ती आणि सांडपाणी व्यवस्थापन या विषयांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
प्रशानातील शिस्त बिघडल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी
गेल्या साडेतीन वर्षांपासून पुणे महापालिका(Pune Municipal Corporation) प्रशासकाच्या हाती आहे. नगरसेवक नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. नागरिक आणि माजी नगरसेवक यांच्या तक्रारींवर वेळेवर कार्यवाही होत नसल्याने असंतोष वाढला आहे. अनेक कर्मचारी कामावर उशिरा येतात किंवा लवकर निघून जातात, अशी तक्रार आयुक्तांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि मूलभूत सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. प्रभाग स्तरावर कचरा उचलण्यात अकार्यक्षमता, रस्त्यांचे झाडणकाम न करणे, सांडपाणी दुरुस्तीवर दुर्लक्ष, तसेच अतिक्रमण आणि अनधिकृत फ्लेक्सविरोधात कारवाई न करणे या समस्या ठळकपणे समोर आल्या आहेत. संबंधित विभागांकडे पुरेसे मनुष्यबळ असतानाही काम केवळ कागदोपत्री मर्यादित असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे उपनगरांपासून मध्यवर्ती भागांपर्यंत अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिका(Pune Municipal Corporation) आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत अनेक बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात कामात बदल दिसून आला नसल्याने त्यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे.
Pune Municipal Corporation | पाहणी दौऱ्यानंतर कारवाईला सुरुवात
गेल्या आठवड्यात आयुक्त नवलकिशोर राम यांनी वाघोली, मांजरी, शेवाळवाडी, वडारवाडी आणि जनवाडी परिसरात पाहणी केली. त्यावेळी रस्त्यांवर सांडपाणी वाहणे, जागोजागी कचरा पडणे आणि अस्वच्छता दिसून आल्याने नागरिकांचा संताप व्यक्त झाला. या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत आयुक्तांनी तत्काळ काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली. रस्ता-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांसह दोन अभियंत्यांची बदली करण्यात आली.
त्यानंतर हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि मुकादम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याशिवाय, घोले रस्ता-शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांसह चौघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेतील(Pune Municipal Corporation) अधिकाऱ्यांची ही जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती रोखण्यासाठी आयुक्तांनी पुढील काही दिवसांत सर्व विभागांची आकस्मिक पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित तोडगा निघावा आणि शहरातील स्वच्छतेचे चित्र बदलावे, यासाठी प्रशासनात शिस्त आणि जबाबदारी आणण्याचा नवा संकल्प आयुक्तांनी स्पष्ट केला आहे.






