Coldrif Cough Syrup | मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे तब्बल १५ चिमुकल्यांचा बळी गेला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असून, पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक दावा केला आहे. हा सिरप डॉक्टरांनी लिहून देण्यासाठी कंपनीने त्यांना १० टक्के कमिशन दिले होते, असा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी डॉ. प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
कमिशनसाठी औषध दिल्याचा पोलिसांचा दावा :
छिंदवाडा जिल्ह्यातील शासकीय आरोग्य केंद्रावर कार्यरत असलेल्या डॉ. प्रवीण सोनी यांनी उपचारासाठी ‘कोल्ड्रिफ’ हे औषध लिहून दिल्यानंतर १५ मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, डॉ. सोनी यांना श्रीसेन फार्मास्युटिकल कंपनीकडून कोल्ड्रिफ सिरप रुग्णांना देण्यासाठी १० टक्के कमिशन दिले जात होते. या औषधात बंदी घातलेल्या घटकांचे प्रमाण असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, या सिरपमुळे मुलांना मूत्रविकार आणि किडनीचे आजार झाले. (Coldrif Cough Syrup)
डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसने १८ डिसेंबर रोजीच चार वर्षांखालील मुलांना अशा प्रकारच्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांचा वापर टाळावा, अशी सूचना दिली होती. तरीही डॉ. सोनी यांनी कोल्ड्रिफसह इतर औषधे मुलांना लिहून दिली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या औषधामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचेही समोर आले आहे.
Coldrif Cough Syrup | डॉक्टरांचा बचाव :
या सर्व आरोपांना डॉ. सोनी यांनी न्यायालयात फेटाळून लावले आहे. “मी सरकारी डॉक्टर असून उपचारांदरम्यान क्वचितच औषध लिहून देतो. औषधांच्या गुणवत्तेची जबाबदारी औषध प्रशासन विभागाची असते,” असा दावा त्यांनी केला. सोनी गेली ३५ ते ४० वर्षं वैद्यकीय सेवेत असून त्यांनी जाणूनबुजून चुकीचे औषध दिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
तथापि, पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. सोनी यांच्या नातेवाईकांच्या मालकीचे मेडिकल त्यांच्या क्लिनिकशेजारीच असून कोल्ड्रिफ सिरपचा मोठा साठा तिथे आढळून आला. तसेच या औषधाचा डीलरदेखील त्यांच्या कुटुंबाचाच भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात श्रीसेन कंपनीचे संचालक रंगनाथन यांनाही अटक करून चौकशीसाठी तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Coldrif Cough Syrup)
तामिळनाडू सरकारनेही कंपनी बंद करण्याचे आदेश दिले :
छिंदवाडा येथील परासिया भागात ५ वर्षांखालील मुलांना साध्या सर्दी, ताप आणि खोकल्याच्या उपचारासाठी कोल्ड्रिफ औषध देण्यात आले होते. मात्र, हे औषध घेतल्यानंतर मुलांना लघवी करण्यास त्रास होऊ लागला आणि काहींच्या किडनीवर परिणाम झाला. उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलेल्या या मुलांपैकी १५ चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून श्रीसेन फार्मास्युटिकल कंपनीला टाळं ठोकण्यात आलं आहे. तामिळनाडू सरकारनेही कंपनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्ड्रिफ प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रातील नीतिमत्ता आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणाचा निकाल काय लागेल हे पुढील चौकशीत स्पष्ट होणार आहे, मात्र निष्पाप चिमुकल्यांचा जीव गमावणारे पालक मात्र आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.






