Digital Arrest Scam | मुंबईत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांनी स्वतःला ईडी आणि सीबीआय अधिकारी म्हणून दाखवत एका ७२ वर्षीय व्यावसायिकाला आभासी कैदेची भीती दाखवली. या फसवणुकीत देशातील आजवरची सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट घोटाळा उघड झाला असून, महाराष्ट्र सायबर विभागाने तिघांना अटक केली आहे. (Digital Arrest Scam)
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ५८ कोटींची लूट :
दक्षिण मुंबईतील ७२ वर्षीय व्यावसायिकाशी १९ ऑगस्ट रोजी सायबर भामट्यांनी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवले. मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगून त्या व्यावसायिकाला मानसिकदृष्ट्या घाबरवण्यात आले. त्यानंतर ‘आभासी कैद’ अर्थात डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून १९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ५८ कोटी १३ लाख रुपये उकळण्यात आले. हे पैसे एकूण १८ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळविण्यात आले. (Digital Arrest Scam)
ही देशातील आजवरची सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट फसवणूक असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी मुंबईत २० कोटी आणि दिल्लीत २३ कोटी रुपयांची अशाच प्रकारे फसवणूक झाली होती. मात्र, ५८ कोटींच्या या फसवणुकीने सर्वच प्रकरणांना मागे टाकले आहे.
Digital Arrest Scam | तिघांना अटक; बाकी आरोपींचा शोध सुरू :
सायबर पोलिसांनी या गुन्ह्यांप्रकरणी अब्दुल नासिर खुल्ली, चिरा बाजार येथील स्टील व्यापारी अर्जुन काडवासरा आणि त्याचा भाऊ जेठाराम कडवासरा या तिघांना अटक केली आहे. या तिघांच्या खात्यावर तब्बल २५ लाख रुपये जमा झाल्याचे आढळले आहे. पोलिसांनी संबंधित बँक खाती गोठवली असून, आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.या गुन्ह्यात साखळी पद्धतीने अनेक खातेधारकांचा वापर करून पैसे वळविण्यात आले. हे पैसे देशाबाहेरही वळविण्यात आले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास अधिक गतीने सुरू केला असून, अनेक राज्यांमध्ये तपासाचे जाळे पसरवण्यात आले आहे.
‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest Scam) हा सायबर फसवणुकीचा एक नवीन प्रकार आहे. या पद्धतीत गुन्हेगार व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला सीबीआय, ईडी किंवा पोलीस अधिकारी म्हणून दाखवतात. समोर नकली पोलीस ठाणे किंवा चौकशीचे दृश्य दाखवून लोकांना घाबरवतात. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली ‘आभासी कैद’ केली असल्याचे सांगून आर्थिक व्यवहारांवर दबाव आणतात.
प्रत्यक्षात ‘डिजिटल अरेस्ट’ ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. मात्र, नागरिक या बनावट चौकशीला घाबरून तडजोडीच्या नावाखाली पैसे देतात. मागील वर्षभरात मुंबईत अशा तब्बल १०२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि अनोळखी व्हिडिओ कॉलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.






