China Earthquake | चीनमधील किंघाई प्रांतात मंगळवारी अवघ्या 40 मिनिटांच्या कालावधीत सलग आठ भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सर्वात तीव्र भूकंपाची नोंद 6.3 रिश्टर स्केल इतकी झाली असून प्रशासनाने तातडीने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
किंघाई प्रांतात प्रशासन अलर्ट मोडवर :
चीनच्या उत्तर-पश्चिम भागातील किंघाई (Qinghai) प्रांतात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6.40 वाजता भूकंपाचे धक्के जाणवण्यास सुरुवात झाली. सर्वात मोठ्या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते. हे केंद्र प्रांतीय राजधानी शियानिंग (Xining) शहरापासून अंदाजे 567 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्राथमिक अहवालानुसार, या भूकंपांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली आहे. कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काम थांबवून त्वरित बाहेर पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
China Earthquake | बचावकार्याला वेग; नुकसानाचा आढावा सुरू :
भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीचे नेमके स्वरूप जाणून घेण्यासाठी प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात मदत आणि बचावकार्यांसाठी दोन विशेष वाहने आणि 10 बचाव जवानांना प्रभावित भागात रवाना करण्यात आले आहे. परिस्थितीनुसार पुढील मदत पथके पाठवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
तिबेट पठाराच्या सीमेलगत असलेला किंघाई प्रांत भूगर्भीयदृष्ट्या अतिसंवेदनशील मानला जातो. या भागात भूकंपाच्या घटना वारंवार घडत असल्या, तरी इतक्या कमी वेळेत सलग आठ धक्के जाणवल्याने चिंता वाढली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले आहे.






