Chhagan Bhujbal | महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद चांगलाच पेटलेला असताना, आज झालेल्या मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना खाडाखोड करून नोंदी बदलल्या जात आहेत. कागदपत्रांवर हाताने बदल करून “मराठा-कुणबी” (Maratha- Kunbi) किंवा “कुणबी- मराठा” असे लिहिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणी भुजबळांनी केली.
ओबीसींना अन्याय, तर मराठ्यांना मोठा निधी? :
भुजबळ म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत ओबीसींसाठी फक्त २,५०० कोटी रुपये खर्च झाले, तर गेल्या ३ वर्षांत मराठा समाजासाठी तब्बल २५ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाला ७५० कोटी रुपये, पण मागासवर्गीय विकास महामंडळाला फक्त ५ कोटी रुपये देण्यात आले. हा मोठा विरोधाभास असून ओबीसींवर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भुजबळांनी (Chhagan Bhujbal) आणखी एक मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, ओबीसींचा सरकारी सेवेत २३ टक्के वाटा असला तरी प्रत्यक्षात केवळ ९ टक्के लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. जवळपास २/३ बॅकलॉग अजूनही भरायचा बाकी आहे. हा बॅकलॉग तातडीने भरावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच, जिल्हा वसतीगृह, प्रादेशिक ओबीसी कार्यालयांना जागा देण्याचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
Chhagan Bhujbal | मराठा प्रमाणपत्र प्रक्रियेत गडबड? :
भुजबळ म्हणाले की, न्यायमूर्ती शिंदे समिती जुन्या नोंदी शोधण्यासाठी नेमली होती. पण आता प्रत्यक्ष खोट्या नोंदी तयार केल्या जात आहेत. त्यामुळे याबाबत तपास करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी, असा त्यांनी आग्रह धरला. पत्रकारांनी सरकार तुमचं ऐकत नाही का, असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, “मी आत्ता फक्त बैठकीबाबतच बोलणार, त्यापेक्षा जास्त नाही.”
भुजबळांनी सांगितले की, मराठा समाजाने आंदोलन करून दक्षिण मुंबई बंद केली आणि त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन जीआर काढला. मात्र, ओबीसी समाजातील ४ जणांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.






