Employee Bonus | ऐन दिवाळीच्या तोंडावर चंदीगडचे (Chandigarh) प्रसिद्ध समाजसेवक आणि उद्योजक एम.के. भाटिया (M.K. Bhatia) पुन्हा एकदा त्यांच्या औदार्यामुळे चर्चेत आले आहेत. सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट म्हणून तब्बल ५१ आलिशान गाड्यांचे वाटप केले आहे, ज्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट: ५१ गाड्यांचे वाटप :
यावर्षी एम.के. भाटिया (M.K. Bhatia) यांनी आपल्या टीममधील सदस्यांना आणि काही सेलिब्रिटी मित्रांना मिळून एकूण ५१ लक्झरी कार्स भेट म्हणून दिल्या. कर्मचाऱ्यांच्या कामातील हुद्दा (rank) आणि त्यांची कामगिरी (performance) यानुसार या गाड्यांचे वाटप करण्यात आले. शोरूममधून नव्या कोऱ्या गाड्यांच्या चाव्या स्वीकारताना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
या आनंदात भर घालण्यासाठी, सर्व नवीन कार मालकांनी एकत्र येत शहरात एक ‘कार गिफ्ट रॅली’ काढली. सजवलेल्या आलिशान गाड्यांचा हा ताफा जेव्हा रस्त्यावरून निघाला, तेव्हा शहरवासीयांनीही कुतूहलाने मोबाईल काढून त्याचे व्हिडिओ बनवले. या अनोख्या दिवाळी भेटीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
Employee Bonus | माझी टीम, माझी ताकद: भाटियांच्या औदार्यामागील भावना :
एखादा उद्योजक दरवर्षी इतक्या महागड्या भेटवस्तू का देतो, असा प्रश्न अनेकांना पडला. यावर एम.के. भाटिया (M.K. Bhatia) यांनी सांगितले की, ‘माझे सहकारीच माझ्या फार्मा कंपन्यांची खरी ताकद आहेत. त्यांची मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळेच आम्ही यशस्वी झालो आहोत. त्यामुळे त्यांना सन्मानित करणे आणि प्रेरित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे.’ ही केवळ भेटवस्तू नसून, आपल्या टीमप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा हा एक मार्ग असल्याचे ते म्हणाले.
एम.के. भाटिया अनेक वर्षांपासून फार्मा क्षेत्राशी संबंधित आहेत. २००२ मध्ये दिवाळखोरीचा सामना केल्यानंतर, २०१५ मध्ये त्यांनी पुन्हा उभारी घेत स्वतःची कंपनी सुरू केली आणि आज त्यांच्या १२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. ‘असा बॉस प्रत्येकाला मिळावा,’ ‘रिअल लाईफ सांता’ अशा प्रतिक्रिया देत युजर्सनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. भाटिया यांनी दाखवून दिले आहे की यश हे केवळ कमाईत नाही, तर आनंद वाटण्यातही आहे.






