Central Railway QR Code Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने स्टेशनवरील QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याची सेवा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ सप्टेंबर २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून, आता प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी तिकीट खिडक्या, एटीव्हीएम मशीन किंवा जेटीबीएस केंद्रांवर जावे लागेल. मात्र, UTS ॲपद्वारे स्टेशनबाहेरून तिकीट घेण्याची सुविधा सुरू राहणार आहे.
का घेतला निर्णय? :
रेल्वे प्रशासनाने २०१६ मध्ये UTS ॲप सुरू करून QR कोड स्कॅनिंगद्वारे तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. यामुळे प्रवाशांना रांगेत उभे न राहता तिकीट मिळत होते. पण हळूहळू या सुविधेचा गैरवापर वाढू लागला.
अनेक प्रवासी रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस (TC) दिसल्यावरच तात्काळ QR कोड स्कॅन करून तिकीट काढू लागले. (Central Railway QR Code Ticket)
QR कोड इंटरनेटवर सहज उपलब्ध झाल्याने कुठूनही तिकीट काढणे शक्य झाले.
या प्रकारामुळे रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळेच जुलै महिन्यात मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे सेवा बंद करण्याची शिफारस केली होती, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे.
Central Railway QR Code Ticket | पश्चिम रेल्वेने आधीच घेतला निर्णय :
मध्य रेल्वेच्या आधीच पश्चिम रेल्वेने QR कोड स्कॅन तिकीट सेवा बंद केली होती. त्यामुळे आता दोन्ही प्रमुख रेल्वे मार्गांवर ही सुविधा उपलब्ध राहिलेली नाही. यामुळे प्रवाशांना स्टेशनात प्रवेश करण्याआधीच तिकीट घेणे बंधनकारक झाले आहे.
दरम्यान, QR कोड स्कॅन सेवा बंद असली तरी रेल्वे प्रशासन नव्या उपाययोजनेच्या विचारात आहे. तसेच स्थानकांवर डायनॅमिक QR कोड स्क्रीन लावण्याची योजना आहे. याशिवाय काही सेकंदांनी बदलणारे हे QR कोड असल्याने त्याचा गैरवापर होणार नाही. तसेच ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रवाशांना तिकीट खिडकी, एटीव्हीएम किंवा जेटीबीएस यांद्वारेच तिकीट घ्यावे लागणार आहे.






