Gopichand Padalkar | नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक भाषण केले. त्यांनी राज्यातील मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आणि प्रत्येक गावात धर्म दल स्थापन करण्याची मागणी केली. तसेच, हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले.
प्रत्येक गावात धर्म दल स्थापन करण्याची गरज :
पडळकर म्हणाले, “गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक मंदिरांमध्ये देवी-देवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली आहे. हे सगळे नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. सरकारने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश द्यावेत. तसेच, प्रत्येक गावात धर्म दल स्थापन करण्याची गरज आहे.”
त्यांनी पुढे म्हटले, “शाळा-कॉलेजांमध्ये मुली काय करतात, याकडे लक्ष द्या. हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन, असे चित्र सध्या आहे. मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत, ते त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली बाटवत आहेत. काश्मीरची परिस्थिती काय आहे? आज पर्यटक तिथे जातात, त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या जातात.
भारतातील तथाकथित सेक्युलर लोकांनी गोळ्या घालणाऱ्यांना धर्म विचारला पाहिजे. हा मोदींचा भारत आहे, पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना मारले जाते. औरंगजेबाच्या कबरीचा विषय आला की, ते महत्त्वाचे नाही, असे म्हणतात. आता आर्थिक कोंडीची कारवाई करायला लागेल. ज्याच्या डोक्यावर टिळा, त्याच्याकडूनच खरेदी करा. हलाल काय आहे, त्याचा सगळा पैसा हिंदूविरोधी कारवायांसाठी वापरला जातो.”
Gopichand Padalkar | लव्ह जिहादच्या मुद्द्यांवरही भाष्य केले :
पडळकर यांनी धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यांवरही भाष्य केले. ते म्हणाले, “राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरू आहे. लव्ह जिहाद सुरू आहे. या सगळ्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. तुम्ही हे सगळं घरापर्यंत येण्याची वाट का पाहता? लँड जिहाद किती झाले? मोकळी जागा दिसली की मशीद बांधतात. त्यांच्याकडे लष्कर आणि रेल्वेपेक्षा जास्त जागा आहे. हे वक्फ बोर्ड आले कुठून? औरंगजेबालाही माहीत नव्हते.
भारत स्वतंत्र होईपर्यंत नव्हते. कायदा लागू करण्याची वेळ का आली? राम मंदिर बांधल्यापासून सरकारला महसूल मिळाला. १३० मोक्याच्या जागा सरकारने लोकसभा लागण्यापूर्वी देऊन टाकल्या. इंग्रजांनी घेतलेल्या जागा देऊन टाकल्या, ही सरकारची मालमत्ता दिली. विश्व हिंदू परिषदेने यावर आवाज उठवला होता.”
जिहादी संभाजी महाराजांना बदनाम करत आहेत :
पडळकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलताना म्हटले, “आज पाकिस्तानात फटाके वाजत आहेत, धूर चीनमध्ये निघत आहे. छत्रपती संभाजी महाराज वाघाचे बछडे होते. त्यांनी डरकाळी फोडली, तर मोगलांचा थरकाप उडायचा. संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याविषयी चुकीचे लिहिले गेले. संभाजी महाराज शूर योद्धे होते, कुशल रणनीतीकार होते. शंभू महाराज आपल्या हिंदुस्थानासमोर आदर्श आहेत. धर्माचे संरक्षण कसे करावे, हे त्यांनी शिकवले.
एक खासदार झाला, जो नाटक करत करत मोठा झाला. त्याने छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना सेक्युलर करण्यासाठी आपले आयुष्य घालवले. संभाजी महाराज १०० टक्के धर्मवीर होते. त्यांच्या इतिहासात तोडफोड होत आहे. जिहादी संभाजी महाराजांना बदनाम करत आहेत. संभाजी महाराजांचे नाव बीडीला देण्यात आले आहे.”
या सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले फलक झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.






