नवरीनेच दिली होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी, कारण ऐकून पोलीसही हादरले

On: April 1, 2025 2:28 PM
---Advertisement---

Crime News | होणारा नवरा पसंत नसल्यामुळे, एका तरुणीने गुंडांना तब्बल दीड लाख रुपयांची सुपारी देऊन त्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांनी (Yavat Police) उघडकीस आणला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) होणाऱ्या नवऱ्याला अडवून जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील पाच जणांना अटक केली असून, सुपारी देणारी नवरी मुलगी मात्र अद्याप फरार आहे.

न पसंत असलेल्या नवऱ्याला संपवण्याचा कट आणि हल्ला

या प्रकरणी सागर जयसिंग कदम (वय २८, रा. माहीजळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर कदम यांचा विवाह श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे (Mayuri Sunil Dangade) हिच्याशी निश्चित झाला होता. सागर एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात. मात्र, सागर हा नवरा म्हणून पसंत नसल्याने मयुरीने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला, असा आरोप आहे. तिने त्यासाठी अहिल्यानगर आणि श्रीगोंदा परिसरातील काही गुंडांना सुमारे दीड लाख रुपयांची सुपारी दिली.

आरोपींनी सुपारी घेतल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास दौंड (Daund) तालुक्यातील खामगाव फाटा (Khamgaon Phata) परिसरात सागर कदम यांना अडवले. “तू मयुरीशी लग्न केले तर तुला दाखवितो?” अशी धमकी देत आरोपींनी सागरला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर सागर कदम यांनी यवत पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांचा तपास, आरोपींना अटक

या गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर यवत पोलिसांनी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख (Police Inspector Narayan Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे (वय १९) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा मयुरी दांगडे आणि संदीप गावडे (Sandeep Gawde) यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली.

या कबुलीनंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने उर्वरित चार आरोपींना अटक केली. यामध्ये संदीप बादा गावडे (वय ४०), शिवाजी रामदास जरे (वय ३२), इंद्रभान सखाराम कोळपे (वय ३७) आणि सुरज दिगंबर जाधव (वय ३६) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली एक चारचाकी गाडीदेखील जप्त केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानली जाणारी नवरी मुलगी मयुरी दांगडे ही मात्र अद्याप फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेची (Bharatiya Nyaya Sanhita – BNS) वाढीव कलमे १०९, ६१(२), १२६(२) लावण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने (API Mahesh Mane) करत आहेत.

 Title : Bride Hires Goons Kill Fiance Pune Police

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now