Singer Sachin Sanghvi Arrest | बॉलिवूड संगीतविश्वावर एक धक्कादायक आरोप समोर आला आहे. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जोडी सचिन-जिगर मधील सचिन संघवी याच्यावर 19 वर्षीय तरुणीने बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल करत सांताक्रूझ पोलिसांकडे तपास वर्ग केला असून, सचिन संघवीला अटक करण्यात आली आहे. (Singer Sachin Sanghvi Arrest)
तक्रारीनुसार, अल्बममध्ये काम देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून गायकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जलद कारवाई करत सचिन संघवीला ताब्यात घेतलं. तथापि, अटकेनंतर काही तासांतच त्याला जामीन मिळाल्याचं वृत्त आहे.
इंस्टाग्रामवरून ओळख, अल्बमचं आमिष आणि अत्याचाराचा आरोप :
तरुणीच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये सचिन संघवी यांनी इंस्टाग्रामवरून तिला संपर्क केला. “तुला माझ्या नव्या अल्बममध्ये संधी देईन,” असा मेसेज पाठवण्यात आला होता. त्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला आणि मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. काही दिवसांतच सचिन संघवीने तिला म्युझिक स्टुडिओमध्ये बोलावलं आणि तिथे लग्नाचं आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे नमूद केलं आहे की, या दरम्यान ती गरोदर राहिली असता सचिन संघवी यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतला. त्यानंतर मात्र त्यांनी कोणताही संपर्क ठेवला नाही. त्यामुळे अखेर पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
Singer Sachin Sanghvi Arrest | अटकेनंतर काही तासांतच जामीनावर सुटका :
या तक्रारीनंतर विलेपार्ले पोलिसांनी सचिन संघवीविरोधात बलात्कार आणि महिलांच्या सन्मानास बाधा आणण्याचे गंभीर गुन्हे दाखल केले. प्रकरणाचा तपास सांताक्रूझ पोलिसांकडे सोपवण्यात आला. चौकशीनंतर सचिनला अटक करण्यात आली, मात्र काही तासांतच जामीन मिळाल्याने त्याची सुटका करण्यात आली. (Singer Sachin Sanghvi Arrest)
सचिन संघवी हा मूळचा गुजरातमधील असून, सध्या तो मुंबईत वास्तव्यास आहे. तो अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्याने सचिन-जिगर या जोडीसोबत अनेक हिट गाणी दिली आहेत.
संगीत क्षेत्रातील योगदान :
संगीतकार म्हणून सचिन संघवी यांनी ‘ओह माय गॉड’, ‘एबीसीडी’, ‘तेरे नाल लव हो गया’, ‘क्या सुपर कूल है हम’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘गो गोवा गॉन’ यांसारख्या चित्रपटांना संगीत दिलं आहे. तसेच, त्यांनी ए.आर. रहमान, अमित त्रिवेदी, अनु मलिक यांसारख्या दिग्गजांसोबतही काम केलं आहे.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व पुरावे आणि संवाद तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.






