BMC Election Result | मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेली २५ वर्षे मुंबईवर वर्चस्व असलेल्या ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) यावेळी सत्तेपासून दूर राहावे लागले असून भाजपा-एकनाथ शिंदे (Eknath shinde) युतीने स्पष्ट बहुमत मिळवत मुंबई पालिकेवर झेंडा फडकावला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाली का, की तरीही त्यांनी आपली राजकीय जमीन टिकवून ठेवली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्यातील २९ महापालिकांच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, मुंबई महापालिकेची लढत सर्वाधिक चर्चेत होती. ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि मनसे यांनी पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली होती. मात्र निकालात भाजपा-शिंदे गटाची युती वरचढ ठरली आणि ठाकरे गटाला सत्तेपासून दूर राहावे लागले.
मुंबई महापालिकेचा निकाल काय लागला? :
मुंबईतील २७७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ९७ जागा जिंकल्या असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३० जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या १२७ झाली असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६४ जागा मिळाल्या आहेत, तर मनसेला ९ जागा मिळाल्या. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मिळून १५ जागा मिळाल्या असून, अपक्ष व इतरांना ११ जागा मिळाल्या आहेत.
या निकालामुळे मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. ठाकरे गटाची २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली असली तरी पक्षाला मिळालेल्या जागांची संख्या पाहता त्यांची राजकीय उपस्थिती अजूनही मजबूत असल्याचे दिसते.
BMC Election Result | ठाकरे गटाला फटका की ताकद टिकली? :
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. अनेक नेते, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गट कमजोर झाला असल्याचे सांगितले जात होते. मात्र २०१७ मध्ये एकत्र शिवसेनेला ८४ नगरसेवक मिळाले होते, तर यावेळी पक्षाचे दोन तुकडे होऊनही उद्धव ठाकरे गटाने ६४ नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे त्यांची मुंबईतील पकड पूर्णपणे सुटली आहे, असे म्हणता येत नाही. (BMC Election Result 2026)
दुसरीकडे मनसेला ९ जागा मिळाल्याने राज ठाकरे यांनाही काही प्रमाणात फायदा झाल्याचे मानले जात आहे. भाजपाने २०१७ मध्ये ८२ जागा जिंकल्या होत्या, त्या तुलनेत यावेळी ९७ जागा मिळवत आपली ताकद वाढवली आहे. काँग्रेसच्या जागांमध्ये मात्र घट झाली आहे. एकूणच निकाल पाहता ठाकरे गट सत्तेबाहेर गेला असला तरी त्यांची राजकीय ताकद पूर्णपणे संपलेली नाही, तर भाजप-शिंदे युतीने मुंबईत निर्णायक वर्चस्व मिळवले आहे.






