Nilesh Ghaiwal | कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गुंड निलेश घायवळविरोधात (Nilesh Ghaiwal) अखेर इंटरपोलने ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी केली आहे. पुणे पोलिसांच्या विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे परदेशात पसार झालेल्या घायवळचा ठावठिकाणा शोधण्यास मोठी मदत होणार आहे. निलेश घायवळ नऊ सप्टेंबर रोजी देश सोडून परदेशी पळून गेला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात मकोका (MACOCA) गुन्हा दाखल करत इंटरपोलला पत्र पाठवले होते. शनिवारी सायंकाळी जारी झालेली ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ विविध देशांना पाठविण्यात आली असून, त्यातून घायवळ सध्या कुठे आहे हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
कोथरूड गोळीबार प्रकरण आणि आरोपींची यादी :
कोथरूड परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात टोळीप्रमुख निलेश बन्सीलाल घायवळसह (Nilesh Ghaiwal) मयंक उर्फ माँटी विजय व्यास (वय २९), आनंद अनिल चांदलेकर (वय २४), गणेश सतीश राऊत (वय ३२), मुसाब इलाही शेख (वय ३३), अक्षय दिलीप गोगावले (वय २९), जयेश कृष्णा वाघ (वय ३५) आणि रोहित विठ्ठल आखाडे (वय २९) यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय वादग्रस्त पिस्तूल परवान्यावरून चर्चेत आलेला सचिन घायवळ आणि मयूर उर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय २९) यांच्याविरोधातही कारवाई झाली आहे. ही तक्रार प्रकाश मधुकर धुमाळ (वय ३६, रा. वाकड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud police station) दाखल केली होती.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश घायवळ (वय ४९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. कोथरूड पोलिस ठाण्यातील एका पूर्वीच्या गुन्ह्यात त्याला जामीन मंजूर झाला होता. परंतु, जामिनाच्या अटींनुसार त्याने पासपोर्ट पोलिसांकडे जमा करायचा होता. त्याने वेगळ्या नावाने पासपोर्ट काढून परदेशात पलायन केले, हे तपासात उघड झालं.






