Blood Moon 2025 | आकाशातील खगोलीय घटनांचं वेगळं आकर्षण असतं. असंच एक दुर्मीळ आणि मोहक दृश्य यंदा पाहायला मिळणार आहे. ७ सप्टेंबरच्या रात्री ते ८ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणामुळे चंद्र ८२ मिनिटे रक्तासारखा लाल दिसणार आहे. यालाच ‘ब्लड मून’ म्हटलं जातं.
ब्लड मून म्हणजे काय? :
खग्रास चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेला होते. या वेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधे येते तेव्हा तिची सावली चंद्रावर पडते. पूर्ण चंद्र अंधारात झाकला जातो, मात्र तो काळा दिसत नाही; तर पृथ्वीच्या वातावरणातून वाकलेल्या लाल प्रकाशकिरणांमुळे तो लालसर रंगाचा दिसतो. यालाच ‘ब्लड मून’ म्हटलं जातं.
नासाच्या मते, चंद्राचा लाल रंग प्रत्येक वेळी सारखा नसतो. तो पृथ्वीच्या वातावरणातील धूळ, प्रदूषण, ढग किंवा ज्वालामुखीच्या राखेवर अवलंबून असतो. जितकं प्रदूषण जास्त, तितका गडद लाल चंद्र दिसतो.
Blood Moon 2025 | भारतात ग्रहण कधी दिसेल? :
ग्रहण सुरू होईल: रात्री ९:५८ (७ सप्टेंबर)
ब्लड मूनचा शिखर क्षण: रात्री ११:०० ते १२:२२ (८२ मिनिटे)
ग्रहण समाप्त होईल: पहाटे १:२५ (८ सप्टेंबर)
ही संपूर्ण खगोलीय घटना तब्बल ५ तासांहून अधिक काळ चालेल.
कुठे दिसणार ब्लड मून? :
पूर्णपणे दिसणारे प्रदेश: भारतासह आशिया आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया
आंशिक रूपात दिसणारे प्रदेश: युरोप व आफ्रिका
अदृश्य: अमेरिका
भारतातील प्रमुख शहरे जिथून हे दृश्य उत्तमपणे दिसेल:
दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि चंदीगड.






