Pune Politics | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Gangster Nilesh Ghayawal) प्रकरणामुळे सुरू झालेला राजकीय वाद आता महायुतीच्या घरापर्यंत पोहोचला आहे. शिवसेना (शिंदे गटाचे) (Eknath Shinde Faction) नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजप (BJP) आणि शिवसेना यांच्यातील नाते ताणले गेले आहे. धंगेकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले होते की, “निलेश घायवळ याच्याशी चंद्रकांत पाटील यांचे संबंध आहेत आणि त्यांच्या कार्यालयातील समीर पाटील नावाचा माणूस घायवळचे मेसेज पाटील यांच्यापर्यंत पोहोचवत असतो.”
“चंद्रकांत पाटलांवरील आरोप बिनबुडाचे” : घाटे
या वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी थेट रवींद्र धंगेकर यांच्यावर पलटवार करत, “‘चंद्रकांत पाटील यांच्यावर रवींद्र धंगेकर यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोप बिनबुडाचे असून फक्त ते वैयक्तिक आकसाने केलेले आहेत. फक्त प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी हे आरोप करत आहे. महायुती म्हणजे फेव्हिकॉल का मजबूज जोड आहे.”
“त्यामुळे धंगेकर यांच्यासारख्या कोण्या एका व्यक्तीने टीका केल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं काही होणार नाही. धंगेकर यांनी काल-परवा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये (Congress) आणि मनसे (MNS) मध्ये होते. उद्या दुसरीकडे कुठे असतील माहित नाही. त्यामुळे सातत्याने पक्ष बदलण्याचा त्यांचा स्वभाव असून त्यांना अद्याप आपण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलो आहोत याबाबतचा भान राहिलेलं नाही”, असं धीरज घाटे म्हणाले आहेत.
Pune Politics | “नाहीतर ठोकून काढू” : घाटे
घाटे एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “धंगेकर हे ब्लॅकमेलर आहेत. अशा पद्धतीने विधान करायचं आणि प्रसिद्धीमध्ये राहायचं की त्यांची प्रवृत्ती पुणेकरांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कोणालाही शहाणपण शिकवण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटील यांच्यावर होणारी टीका भाजपचा कोणताही भाजप कार्यकर्ता आता खपून घेणार नाही. त्यांनी हे थांबवलं नाही तर त्यांच्याच भाषेत यापुढे त्यांना ठोकून काढू”, असा इशारा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला.
दरम्यान, हा संपूर्ण वाद निलेश घायवळ प्रकरणावरून सुरु झाला होता, ज्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम (Minister Yogesh Kadam) यांनी निलेशचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या प्रकरणाने आधीच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती, आणि आता त्याचाच राजकीय स्फोट महायुतीच्या एकजुटीवर परिणाम करताना दिसत आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. महायुतीत एकोपा ठेवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच अशा वक्तव्यांनी दोन्ही पक्षांच्या संबंधांमध्ये मिठाचा खडा पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. आता वरिष्ठ नेते हस्तक्षेप करतात का आणि या प्रकरणावर पडदा कधी पडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






