Pune Municipal Corporation Election | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीबाबत पहिली प्रतिक्रिया देताना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र ही लढत मैत्रीपूर्ण असेल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. (Pune Municipal Corporation Election)
महापालिका निवडणुका या राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत मुंबईसह राज्यातील बहुतेक महापालिकांमध्ये जनतेचा कौल आपल्या बाजूने असेल, असा दावा केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये थेट लढत :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार नाहीत. या संदर्भात अजित पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्र लढल्यास त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. (Pune Municipal Corporation Election)
या दोन्ही शहरांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांची ताकद मोठी असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निकाल राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारे असतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
Pune Municipal Corporation Election | राज्यात भाजप-शिवसेना युती कायम :
राज्यातील इतर बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेची युती कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी काही ठिकाणी नगरपालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत.
मतदार याद्यांमधील घोळांबाबत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, काही प्रमाणात त्रुटी असू शकतात, मात्र त्यासाठी निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही. भविष्यात एसआयआर प्रक्रियेमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे मतदार याद्यांमधील घोळ पूर्णपणे दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याने येत्या काही आठवड्यांत राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.






