Local Body Election Update | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Election) घोषणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आयोगाकडून तयारी जवळपास पूर्ण झाली असून, आता फक्त अंतिम मंजुरीनंतर तारखांची घोषणा होईल. या निवडणुका बराच काळ प्रलंबित आहेत आणि राज्यभरातील अनेक नगरपरिषद, नगरपालिका, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्या सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे.
३१ जानेवारीपूर्वी पार पडणार सर्व निवडणुका
न्यायालयानेही या स्थानिक निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयोगावर आता वेळेचा दबाव आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच साधारणतः ५ किंवा ६ नोव्हेंबर रोजी आयोग अधिकृतपणे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू शकतो.
निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका होतील, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, आणि शेवटच्या टप्प्यात महानगरपालिका निवडणुका पार पडतील. (Local Body Election)
सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास केली सुरुवात
राज्यभरातील विविध ठिकाणी मतदार याद्या, आरक्षण प्रक्रिया आणि प्रशासकीय तयारी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती मिळते. यामुळे राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार तयारीला लागले असून, स्थानिक पातळीवर बैठका, चर्चा आणि आघाड्यांचे गणित सुरू झाले आहे. भाजप, शिवसेना (दोन्ही गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) या सर्व पक्षांनी निवडणुका लक्षात घेऊन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. (Local Body Election)
या निवडणुकांमुळे राज्यातील स्थानिक सत्तेचा तोल बदलू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






