Raja Raghuwanshi | इंदूरचे नवविवाहित जोडपे राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. मेघालयचे पोलीस प्रमुख इदाशिशा नोंगरांग यांनी या हत्येमागे केवळ ‘प्रेमाचे त्रिकूट’ हे एकमेव कारण नसावे, असा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. सोहरा येथील इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशीच्या हत्येचा तपास करणारे पोलीस, प्रेम त्रिकोण हे एकमेव कारण मानत नसून, इतर दृष्टीकोनातूनही या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असल्याचे इदाशिशा नोंगरांग यांनी सांगितले आहे.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट
राजा रघुवंशीची हनिमूनला गेला असताना २३ मे रोजी मेघालयात हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी त्याची पत्नी सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि इतर तीन आरोपींना ९ जून रोजी अटक केली.
मेघालयचे डीजीपी इदाशिशा नोंगरांग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, “खरं सांगायचं तर, आरोपींनी हत्येचा जो हेतू सांगितला, तो मला पटणे कठीण जात होतं. त्यांनी सांगितलेली कारणंही पटत नव्हती. आम्ही यामध्ये अतिरिक्त काही आहे का, हे पाहत आहोत. एखादी व्यक्ती लग्नाच्या काही दिवसांतच इतका द्वेष निर्माण करेल की, तुम्ही त्या व्यक्तीला मारण्याचा कट रचता, यावर विश्वास ठेवणे मला खूप कठीण जाते. वरवर पाहता, हा एक प्रेम त्रिकोण दिसतो, परंतु वैयक्तिकरित्या मला विश्वास बसणार नाही की हा एकमेव हेतू आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे हत्येमागे आणखी काही कारणे असू शकतात, असा संशय बळावला आहे.
त्यांनी सध्या तपास पुढे जात असून, सर्व धागेदोरे एकत्र केले जात असल्याची माहिती दिली. तसेच, पोलीस वेळेत आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असून, आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. “तपास सध्या सुरू आहे. अनेक गोष्टी एकत्र करत भक्कम पुरावे गोळा केले जात आहेत. तपास निर्दोष व्हावा आणि आमच्याकडे एक अतिशय ठोस केस असावी यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडत नाही आहोत. आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत आणि आम्ही दिलेल्या वेळेत केस चार्जशीट करण्यासाठी काम करत आहोत,” असे त्या पुढे म्हणाल्या.
Raja Raghuwanshi | मेघालयच्या डीजीपींनी केला मोठा खुलासा
सोनम आणि राजा रघुवंशी यांचे लग्न ११ मे रोजी इंदूर येथे झाले होते आणि २१ मे रोजी ते आसाममधील गुवाहाटी मार्गे मेघालयात हनिमूनसाठी गेले होते. २३ मे रोजी, मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथे दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. २ जून रोजी वेइसावडोंग फॉल्सजवळील एका खोल दरीत राजाचा कुजलेला मृतदेह आढळला. ९ जूनच्या पहाटे सुमारे १२०० किमी अंतरावर उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे दिसलेल्या सोनमसाठी शोध मोहीम सुरू होती. हत्येप्रकरणी तिचा प्रियकर आणि तीन सुपारी किलर यांना अटक करण्यात आली त्याच दिवशी तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सोनमने पोलिसांना सांगितले की, राजाचे हरवलेले दागिने विशिष्ट ठिकाणी ठेवण्यात आले होते, आणि पोलीस त्याबाबत चौकशी करतील.






