BJP | महापालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप (BJP) पुढे आला आहे. तरीही अनेक ठिकाणी स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांच्या मदतीची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिकेत घडणाऱ्या राजकीय हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
महापौर निवडणुकीआधीच राजकीय समीकरणे बदलली :
काही महापालिकांमध्ये महापौर पदासाठी अद्याप निवडणूक बाकी आहे. चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपचा महापौर निवडून आला आणि काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला होता. मात्र भिवंडीमध्ये परिस्थिती वेगळी दिसत आहे. येथे २० तारखेला महापौर निवडणूक होणार असून कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही.
भिवंडी महापालिकेत (Bhiwandi mahapalika) काँग्रेसकडे ३० नगरसेवक आहेत, तर भाजपकडे २२ जागा आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे प्रत्येकी १२ नगरसेवक आहेत. अशा अनिश्चित परिस्थितीत सत्तास्थापनेसाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या ९ नगरसेवकांचा गट काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
BJP | काँग्रेसची ‘सेक्युलर फ्रंट’ रणनीती :
या घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, संख्याबळ नसताना निवडणूक लढवली जात नाही; मात्र भिवंडीत काँग्रेस सर्वाधिक जागांसह पुढे आली आहे. बहुमतासाठी १६ जागांची गरज होती. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून ‘सेक्युलर फ्रंट’ स्थापन करण्यात आला असून त्यानंतर एकूण संख्याबळ ४२ वर पोहोचले आहे.
सपकाळ यांनी स्पष्ट केले की भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा घेण्याची भूमिका काँग्रेसने स्वीकारलेली नाही. मात्र भाजपमधून येणाऱ्यांशी चर्चा करण्यास ते तयार आहेत. नारायण चौधरी पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर भाजपमध्ये गेले होते; आता ते पुन्हा सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले असून ९ नगरसेवकांसह पाठिंबा देत आहेत, असे त्यांनी सांगितले.
याआधी अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भिवंडीत उलट परिस्थिती निर्माण झाली असून भाजपचे ९ नगरसेवक काँग्रेसकडे वळत असल्याने महापौर निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.






