Bharat Gogawale | शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या व्हिडिओमध्ये ते अघोरी पूजा करत असल्याचा दावा समाजमाध्यमांवर केला जात होता. या पार्श्वभूमीवर, आज शिवसेनेच्या वर्धापन दिनीच गोगावले यांनी या सर्व आरोपांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
व्हायरल व्हिडीओ आणि अघोरी पूजेचा दावा –
काही दिवसांपासून मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत होता. या व्हिडिओमध्ये ते काही व्यक्तींसोबत एका धार्मिक विधीमध्ये बसलेले दिसत होते. यावरून, गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा किंवा जादूटोणासारखा प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत होता.
या आरोपांना अधिक खतपाणी घालत, राजकीय फायद्यासाठी ही पूजा केली जात असल्याची चर्चा सुरू झाली. विशेषतः, पालकमंत्री पद मिळवण्यासाठी भरत गोगावले हे अशा प्रकारच्या अघोरी विद्येचा आधार घेत असल्याचा दावा सोशल मीडियावरील अनेक पोस्टमधून केला जात होता.
साधूंचा आशीर्वाद, अघोरी विद्या नव्हे-
या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. “मी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मुशीत तयार झालेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विचारांना मानणारा कार्यकर्ता आहे. मला अघोरी विद्या काय असते हे कळत नाही,” असे त्यांनी म्हटले. जर अशा विद्येने पालकमंत्रीपद मिळत असते, तर ते मी कधीच मिळवले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
घरी झालेल्या त्या विधीबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “माझ्या घरी कधी कधी साधू महाराज आशीर्वाद देण्यासाठी येतात किंवा त्यांचे काही काम असते.” व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील प्रसंग हा असाच साधू-संतांच्या आशीर्वादाचा होता, त्यात कोणताही अघोरी प्रकार नव्हता, असे त्यांनी नमूद केले. आपल्या साध्या राहणीमानाचा उल्लेख करत, “मी घरी कधीकधी टॉवेलवर बसूनही लोकांच्या समस्या सोडवत असतो,” असेही ते म्हणाले.






