Bharat Bandh | ९ जुलै २०२५ रोजी (बुधवार) देशभरात ‘भारत बंद’चे (Bharat Bandh) आवाहन करण्यात आले आहे. १० केंद्रीय कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला असून, शेतकरी व ग्रामीण कामगार संघटनांनीही यात सहभाग दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या उद्योगपती समर्थक आणि कामगार विरोधी धोरणांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रातील सुमारे २५ कोटी कामगार या संपात सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या बंदमुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आहे – काय बंद राहणार आणि काय सुरू? विशेषतः शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बँका व सार्वजनिक वाहतूक यावर याचा नेमका परिणाम काय होईल, याबाबत चिंता वाढली आहे. काही ठिकाणी आंदोलनामुळे रस्ते अडवले जाण्याची शक्यता असल्याने वाहतूक यंत्रणांवरही परिणाम होऊ शकतो.
बँका आणि आर्थिक सेवा ठप्प होण्याची शक्यता :
सार्वजनिक क्षेत्रातील बँका, पोस्टल सेवा आणि काही सहकारी बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बँक शाखांचे व्यवहार, चेक क्लिअरिंग, ग्राहक सेवा यामध्ये अडथळे येऊ शकतात. तरीसुद्धा बँकिंग युनियन्सने अधिकृतरित्या कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही. त्यामुळे बँका पूर्णपणे बंद राहतील का, याबाबत स्थिती स्पष्ट नाही; मात्र अंशतः सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
शाळा व महाविद्यालयांसाठी कोणतीही अधिकृत बंदची सूचना सरकारने दिलेली नाही. तथापि, काही भागांत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शाळा स्वेच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात. काही खाजगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. प्रमुख शहरांमध्ये वाहतूक अडथळ्यामुळे शाळांमध्ये हजेरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Bharat Bandh | राज्य परिवहन कर्मचारी संपात सहभागी होणार! :
राज्य परिवहन कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे एसटी बसेस व सार्वजनिक वाहतूक मर्यादित स्वरूपातच उपलब्ध असू शकते. कॅब सेवा, रिक्षा व खासगी वाहनांच्या संख्येतही घट होऊ शकते. रेल्वे संघटना बंदमध्ये सहभागी नाहीत, परंतु काही राज्यांत निदर्शकांनी रेल्वे स्थानकांवर आंदोलन केल्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक रेल्वेसेवा उशिरा धावू शकते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाची योजना आखताना अतिरिक्त वेळ गृहित धरावा. (Bharat Bandh)
दरम्यान, बंदचा थेट परिणाम तुमच्या भागावर किती होईल, हे स्थानिक संघटनांच्या सक्रियतेवर अवलंबून असेल. मोठ्या शहरांमध्ये वाहतूक व बँकिंग अडचणी संभवतात. अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडताना रेल्वे व बसच्या वेळा तपासूनच निघा. अनावश्यक प्रवास टाळावा आणि विद्यार्थ्यांनी शाळा सुरू आहे की नाही याची खात्री करूनच घराबाहेर पडावे.






