आज २५ कोटी कामगारांच्या ‘या’ मागण्यांसाठी भारत बंद!

On: July 9, 2025 9:24 AM
Bharat Bandh
---Advertisement---

Bharat Bandh | देशभरातील प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी बुधवारी (९ जुलै २०२५) भारत बंदची घोषणा (Bharat Bandh) केली आहे. अंदाजे २५ कोटी कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि ग्रामीण कामगार देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी या बंदचे आयोजन करण्यात आले आहे.

बँका, विमा कंपन्या, कोळसा खाणी, टपाल सेवा, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याने अनेक महत्त्वाच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात सार्वजनिक वाहतूक, शाळा-महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कामगार संघटनांचा निषेध आणि मागण्या :

दहा प्रमुख कामगार संघटनांनी या संपाला पाठींबा दिला असून त्यात INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांचा समावेश आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेत्या अमरजीत कौर यांनी सांगितले की, “देशभरातून २५ कोटींहून अधिक कामगार या संपात सहभागी होणार असून, शेतकरी संघटनाही या आंदोलनात सक्रीय आहेत.”

कामगार संघटनांचा आरोप आहे की, केंद्र सरकारने आणलेले चार नवीन श्रम कोड (Shram Code) म्हणजे कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे आहेत. युनियनच्या हालचालींवर निर्बंध, कामाचे तास वाढवणे, नोकरीतील अस्थिरता ही या धोरणांची काही उदाहरणे आहेत. याशिवाय सरकारी कंपन्यांचे खासगीकरण आणि ठेका पद्धती वाढवण्यालाही संघटनांचा तीव्र विरोध आहे.

Bharat Bandh | शेतकरी संघटनांचाही बंदला पाठिंबा :

संयुक्त किसान मोर्चा या संपात सहभागी झाला आहे. शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमतीला (MSP) कायदेशीर हमी देण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदार केली आहे. याशिवाय जुन्या कृषी कायद्यांविरोधात सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. देशभरातील ग्रामीण भागात धरणे आणि रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कामगार आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या स्पष्ट असून त्यामध्ये – चारही श्रम कोड रद्द करावेत, सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण थांबवावे, किमान वेतन दरमहा ₹२६,००० करावा, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी आणि ग्रामीण-शहरी भागात रोजगार हमी योजनेचा विस्तार करावा – अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. ((Bharat Bandh))

नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती :

या बंदमुळे अनेक सेवा ठप्प राहतील, त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक कामांची नियोजनपूर्वक आखणी करावी. काही शाळा-महाविद्यालये, बँका व परिवहन सेवा आज बंद राहण्याची शक्यता असून, स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश दिले गेले आहेत.

तसेच काही ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

News Title: Bharat Bandh Today: 25 Crore Workers Join Nationwide Strike on 9 July 2025

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now