लग्नापूर्वी आजारपण लपवून ठेवलं; वैतागलेल्या डॉक्टर पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू!

On: October 16, 2025 5:54 PM
Kruthika Reddy
---Advertisement---

Kruthika Reddy | बंगळूरू शहरात सहा महिन्यांपूर्वी गूढ वाटणाऱ्या एका डॉक्टर महिलेच्या मृत्यूचे रहस्य आता उलगडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या डॉक्टर पतीलाच हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. पतीने पत्नीच्या आजारपणाचा गैरफायदा घेत आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करून, भूलचे इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

गॅसच्या त्रासावर दिले मृत्यूचे इंजेक्शन-

मृत डॉक्टर कृतिका एम. रेड्डी (Kruthika M. Reddy) आणि तिचा पती, आरोपी सर्जन डॉ. महेंद्र रेड्डी (Dr. Mahendra Reddy), यांचे अवघ्या वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. कृतिका यांना गॅस आणि चयापचयाशी संबंधित काही जुने आजार होते. महेंद्रने याच आजारपणाला एक कारण बनवून तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला नसेद्वारे अनेक औषधे देण्यास सुरुवात केली.

त्याने आपल्या डॉक्टर पदाचा गैरवापर करून रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटर आणि आयसीयूमधून भूल देणारी औषधे मिळवली. त्याने कृतिका यांना ‘प्रोपोफोल’ नावाचे भूलचे औषध शिफारसीपेक्षा जास्त प्रमाणात दिले. या ओव्हरडोसमुळे कृतिका यांच्या श्वसनप्रणालीवर गंभीर परिणाम झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, दुसऱ्या दिवशी सकाळी कृतिका बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर, स्वतः डॉक्टर असूनही महेंद्रने तिला प्राथमिक उपचार म्हणून सीपीआर देण्याचा प्रयत्नही केला नाही.

हत्येमागील कारण आणि फॉरेन्सिक अहवालाचा खुलासा-

एप्रिल महिन्यात कृतिका यांचा मृत्यू झाला तेव्हा, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. घटनास्थळावरून एक कॅन्युला सेट, इंजेक्शन ट्यूब आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी कृतिका यांच्या शरीरातील नमुने न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे (FSL) तपासणीसाठी पाठवले होते.

फॉरेन्सिक अहवालात कृतिका यांच्या अवयवांमध्ये ‘प्रोपोफोल’ या भूलच्या औषधाचे अंश आढळून आल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली. या अहवालानंतरच कृतिका यांचे वडील मुनी रेड्डी (Muni Reddy) यांना जावई महेंद्रवर संशय आला आणि त्यांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. महेंद्रनेच आपल्या मुलीला (Kruthika Reddy) भूलचे इंजेक्शन देऊन मारल्याचा आरोप त्यांनी केला.

महेंद्रच्या म्हणण्यानुसार, लग्नापूर्वी कृतिकाच्या कुटुंबीयांनी तिच्या आजारपणाबद्दल लपवून ठेवल्याने तो नाराज होता. मात्र, कृतिकाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, महेंद्रने त्यांच्याकडे खाजगी रुग्णालय बांधण्यासारख्या मोठ्या आर्थिक मागण्या केल्या होत्या आणि त्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंधही होते.

News Title – Bengaluru Doctor kills Wife Kruthika Reddy

 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now