संतोष देशमुख हत्याकांडातील कृष्णा आंधळे गावातच मोकाट? पीडित कुटुंबाचा थरकाप उडवणारा दावा

On: February 23, 2026 5:34 PM
Krishna Andhale
---Advertisement---

Krishna Andhale | बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याच्याबाबत आता धक्कादायक दावा पुढे आला आहे. पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो गेल्या सहा महिन्यांत तब्बल तीन वेळा गावात येऊन गेला असून कुटुंबीयांनी जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.

फरार आरोपीचा गावात वावर; सीआयडीकडे माहिती :

संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनानंतर तपास सुरू असताना आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी बीड सत्र न्यायालयात सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कृष्णा आंधळे हा मागील सहा महिन्यांत तीन वेळा मस्साजोग गावात दिसून आला. ही माहिती त्यांनी सीआयडी (Crime Investigation Department – CID) प्रशासनालाही दिली असून, आरोपी गावात आल्याच्या दाव्याला सीआयडीनेही दुजोरा दिल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य आरोपी पोलिसांच्या नजरेआड राहून गावात फिरत असेल, तर कायद्याचा धाक कुठे राहिला, असा सवाल देशमुख कुटुंबाकडून उपस्थित केला जात आहे. आरोपीच्या अटकेस विलंब होत असल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत त्यांनी तातडीने सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

Krishna Andhale | अटक मागणी आणि गावकऱ्यांचा संताप :

या प्रकरणाच्या तपासात हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचा शोध सुरू असतानाच आरोपीचा गावात वावर असल्याचा दावा पोलिस प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी कृष्णा आंधळेला (Krishna Andhale) तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपीला बेड्या ठोकून संपूर्ण बीड जिल्ह्यात त्याची धिंड काढावी, तसेच पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे.

मस्साजोग गावात आधीच संतापाचे वातावरण आहे. आरोपी गावात मुक्तपणे ये-जा करत असल्याची चर्चा पसरल्यानंतर ग्रामस्थांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. आता गृह विभाग आणि सीआयडी पथक या प्रकरणात पुढे काय कारवाई करते, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आरोपीला लवकर अटक न झाल्यास देशमुख कुटुंब पुढील पावले उचलणार का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

News title : Beed Murder Case: Shocking Claim on Accused

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now