Banjara Reservation | बीड जिल्ह्यात आज (१५ सप्टेंबर २०२५) बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी महामोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येने समाजबांधव रस्त्यावर उतरल्यानं वातावरण तापलं. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासनाचा निर्णय आणि हैदराबाद गॅझेटियरचा दाखला यानंतर बंजारांनीही त्याच गॅझेटियरचा आधार घेत आरक्षणाची मागणी अधिक जोमाने पुढे आणली आहे. (Banjara community reservation ST)
खासदार-आमदारांचा उघड पाठिंबा :
बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोर्चाला उघड पाठिंबा दिला आहे. तसेच राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सहा आमदारांनीही बंजारांच्या मागणीसोबत उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. आमदार विजयसिंह पंडित, सुरेश धस, प्रकाश सोळंके (Prakash solanke) यांच्यासह इतरांनीही मोर्चात सहभाग घेतला. एवढंच नव्हे, तर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याही मोर्चात सहभागी झाल्या. (Banjara Reservation)
बीड जिल्ह्यात बंजारा समाजाची लोकसंख्या तब्बल २.५ लाखांच्या घरात असून, त्यापैकी १.९ लाख मतदार आहेत. एवढ्या मोठ्या मतदारसंख्येमुळे कोणत्याही पक्षाला हा समाज नाराज करण्याची हिंमत नाही. गेवराई मतदारसंघातच बंजारा समाजाचे ६३ हजार मतदार असून, माजलगाव व परळीमध्ये तब्बल ७० हजार लोकसंख्या आहे. जिल्ह्यातील १,२८६ लमाण तांडे या समाजाच्या संघटनशक्तीचे दर्शन घडवतात.
Banjara Reservation | मराठा आरक्षणानंतर बंजारांचा एल्गार :
मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याने सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं. आता त्याच धर्तीवर बंजारा समाजाची चळवळ आकार घेत आहे. समाजबांधवांनी स्पष्ट केले की, मराठ्यांना गॅझेटियरमधील नोंदीच्या आधारावर आरक्षण मिळू शकतं, तर बंजारांनाही एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळायलाच हवं. यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरत आहे. (Banjara community reservation ST)
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा राजकीय नेत्यांसाठी मोठं आव्हान मानला जात आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद ते विधानसभा निवडणुकांपर्यंत बंजारा समाजाचा मतांचा निर्णायक प्रभाव राहतो. त्यामुळे नेत्यांनी या समाजाला थेट पाठिंबा देण्याची रणनीती आखली आहे.






