Banking Rule Change | नोव्हेंबर महिन्यापासून बँक ग्राहकांसाठी मोठा बदल होणार आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून देशातील सर्व बँक खात्यांसाठी नवीन नियम लागू होणार असून, ग्राहक आता आपल्या खात्यात चार नॉमिनी जोडू शकतील. या बदलामुळे बँकिंग व्यवस्थेतील दाव्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार आहे. (Banking Rule Change)
या संदर्भात अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, बँकिंग कायदे (सुधारणा) अधिनियम 2025 अंतर्गत ही नवी व्यवस्था राबवली जाणार आहे. या कायद्यात भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934, बँकिंग नियमन कायदा 1949, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 तसेच बँकिंग कंपन्या (अधिग्रहण व हस्तांतरण) कायदा 1970 आणि 1980 या पाच कायद्यांमध्ये एकूण 19 सुधारणा करण्यात आल्या आहेत.
एकाच वेळी चार नॉमिनींची नोंदणी शक्य :
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, बँक ग्राहक आता आपल्या खात्यात एकाच वेळी चार नॉमिनी नोंदवू शकतात. हे नॉमिनी खातेधारकांच्या मृत्यूनंतर कायदेशीर हक्कासाठी दावा करू शकतील. यामुळे खात्यावरील वारसांचा वाद टळेल आणि बँकांना देखील क्लेम प्रक्रिया सोपी होईल.
प्रत्येक नॉमिनीला ठराविक टक्केवारीचा वाटा दिला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, एका खात्यातील रकमेचा 50 टक्के वाटा एका नॉमिनीला, तर उर्वरित 50 टक्के दुसऱ्याला देण्याची सुविधा असेल. यामुळे 100 टक्के रक्कम स्पष्ट प्रमाणात वितरित होईल आणि गैरसमजांना वाव राहणार नाही. (Banking Rule Change)
Banking Rule Change | सलग नॉमिनीची सुविधाही मिळणार :
या नव्या नियमांनुसार, खातेधारकांना सलग (Sequential) नॉमिनी ठेवण्याचीही परवानगी असेल. म्हणजेच, पहिला नॉमिनी जिवंत असेपर्यंत त्यालाच खात्याचा अधिकार असेल; मात्र त्याच्या मृत्यूनंतर दुसरा नॉमिनी आपोआप सक्रिय होईल. अशा पद्धतीने पुढील वारसांसाठीही स्पष्टता राखली जाईल.
या बदलांमुळे ठेवीदार, लॉकर धारक आणि संयुक्त खातेधारक यांना मोठा फायदा होणार आहे. आता बँक खाते किंवा लॉकरसाठी फक्त एक किंवा दोन नाही, तर चार वेगवेगळ्या व्यक्तींना नॉमिनी करता येणार आहे. त्यामुळे दाव्याची प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक होईल.






