Banjara Reservation | मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण दिल्यानंतर आता बंजारा समाजानेही (Banjara Reservation) अशीच मागणी उचलून धरली आहे. या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील मुरूमजवळील नाईकनगरमधील पवन गोपीचंद चव्हाण (वय 32) (Pawan Chavan) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत थेट “बंजारा समाजालाही हैद्राबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे” अशी मागणी केल्याचे समोर आले आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आत्महत्येनंतर बंजारा समाजात संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीय व नातेवाईकांनी स्पष्ट सांगितले की, पवनने आरक्षणाच्या मागणीसाठीच हा टोकाचा निर्णय घेतला.
बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान :
पवन गोपीचंद चव्हाण हा मूळचा लातूर जिल्ह्यातील शाहू कॉलेजमध्ये बी.कॉम पदवीधर होता. सध्या तो बेरोजगार होता आणि बंजारा समाजाच्या प्रश्नांवर सक्रिय होता. काही दिवसांपूर्वी तो जालना जिल्ह्यातील जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. दोन दिवस तो तिथे राहून समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत होता. (Banjara Reservation)
कालच तो मुरूमजवळील नाईकनगरला परत आला होता. रात्री उशिरापर्यंत तो मित्रांसोबत आरक्षणाविषयी चर्चा करत होता. मात्र आज सकाळी तो अचानक आपल्या घरात गेला आणि बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबियांना व समाजाला धक्का बसला आहे.
Banjara Reservation | सुसाईड नोटमध्ये आरक्षणाची मागणी :
घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी पंचनामा केला. तपासादरम्यान पवनच्या खिशातून सुसाईड नोट सापडली. त्यात त्याने थेट लिहिले की, “हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे”. या पत्रातून त्याचा संताप व हतबलता दिसून आली.
कुटुंबीयांनी सांगितले की, पवन नेहमी समाजाच्या प्रश्नांवर बोलत असे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
समाजात संताप आणि राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह :
या घटनेनंतर बंजारा समाजात (Banjara Reservation) तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळालं, पण आमच्याकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे तरुणांना असे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे,” अशी भावना व्यक्त केली जात आहे. पवनची आत्महत्या ही केवळ एका कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी वेदनादायी ठरली आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, अशा घटना टाळण्यासाठी सरकारने तातडीने समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा आरक्षणाच्या चळवळी अधिक तीव्र होऊ शकतात.






