Ayush Komkar Murder | पुण्यातील गँगवॉरच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या आयुष कोमकर हत्याकांडात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह (Ayush Komkar Murder) सहा जणांना गुन्हे शाखेने सोमवारी मध्यरात्री अटक केली. बुलढाणा येथे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदेकर टोळीला पोलिसांनी सापळा रचून पकडले. विशेष म्हणजे, अटक झालेल्यांमध्ये बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातवांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मध्यरात्रीची मोठी कारवाई :
५ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकरवर (Ayush Komkar Murder) आंदेकर टोळीने गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्यात अमन पठाण आणि यश पाटील यांनी सहभाग घेतला होता. या घटनेनंतर पुणे शहरात पुन्हा टोळीयुद्धाचे वातावरण तयार झाले. घटनेनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री उशिरा धडक कारवाई करत आणखी सहा जणांना मुसक्या आवळल्या.
या प्रकरणात एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (६०), कृष्णराज आंदेकर (४१), शुभम आंदेकर (३१), अभिषेक आंदेकर (२१), शिवराज आंदेकर (२९), लक्ष्मी आंदेकर (६०), वृंदावनी वाडेकर (४०), तुषार वाडेकर (२६), स्वराज वाडेकर (२२), अमन पठाण, सुजल मेरगु (२३), यश पाटील आणि अमित पाटोळे (१९) या नावांचा समावेश आहे. आधीच्या कारवाईत यश पाटील आणि अमित पाटोळेला पकडण्यात आले होते.
Ayush Komkar Murder | मागील खून प्रकरणाशी संबंध :
मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj andekar) यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात गणेश कोमकरसह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची हत्या केली, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. आयुषवर त्याच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
या घटनेनंतर पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध सुरू होण्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करून सहा आरोपींना पकडले असले तरी या संघर्षामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस प्रशासनाने खबरदारी म्हणून गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.






