Ayush Komkar Murder | पुण्यातील गाजलेल्या आयुष कोमकर खूनप्रकरणात नवा धक्कादायक तपशील समोर आला आहे. या खटल्यात आतापर्यंत म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर (Bandu andekar) यांच्यावर संशयाची सुई होती. मात्र तपासात स्पष्ट झाले की खुनासाठी वापरलेले पिस्तूल बंडू आंदेकर नव्हे तर त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर यानेच पुरवले होते.
कृष्णा आंदेकरच मुख्य ‘लिंक’ :
नाना पेठमधील या खुनानंतर कृष्णा आंदेकर (Krushna andekar) फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी वडील बंडू आंदेकर यांनी “कृष्णाचा शोध लावा नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल” अशी थेट विधानं केली होती. त्यानंतर कृष्णा स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दावा केला की, कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणारे आरोपी यांच्यातील मुख्य दुवा होता.
गुन्ह्यातील इतर आरोपी अमन पठाण आणि सुजल मेरगू यांनी पोलिसांसमोर कबुली दिली की, खुनासाठी वापरलेले पिस्तूल त्यांना कृष्णा आंदेकरनेच दिले होते. त्यामुळे तपासाचा फोकस आता कृष्णावर केंद्रित झाला आहे. फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता, पुरावे नष्ट केले का आणि हे शस्त्र नेमके कुठून मिळाले याची चौकशी सुरू आहे.
Ayush Komkar Murder | न्यायालयीन सुनावणी :
गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर कृष्णाला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील विलास पठारे आणि एसीपी शंकर खटके यांनी सांगितले की, हा खून मालमत्ता आणि पैशांच्या वादातून झाला असून कृष्णाची चौकशी आवश्यक आहे. दुसरीकडे बचाव पक्षाने तो स्वतःहून हजर झाला आणि सहकार्य करतोय, म्हणून पोलिस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद केला.
मात्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करत कृष्णा आंदेकरला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न :
चौकशीत पोलिसांनी कृष्णाकडे मोबाइल मागितला असता, त्याने तो फोडून टाकल्याचे मान्य केले. इतकंच नव्हे तर मकोका कायद्यानुसार दिलेल्या नोटीसलाही त्याने स्वाक्षरी करायला नकार दिल्याची कबुली दिली. त्यामुळे या खटल्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.






