Ayush Komkar Murder | पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडानंतर सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या १९ वर्षांच्या आयुषवर ५ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आंदेकर टोळीने नऊ गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेनंतर दोन दिवस त्याचे पार्थिव ससून रुग्णालयात ठेवण्यात आले होते. अखेर सोमवारी संध्याकाळी कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले.
तुरुंगातून आलेला वडीलाचा आक्रोश :
आयुषच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील गणेश कोमकर (Ganesh komkar) यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर आणण्यात आले होते. स्मशानभूमीत पोलीसांच्या गाडीतून उतरलेल्या गणेश कोमकरच्या हातात मुलाने त्याला पाठवलेले एक ग्रिटिंग कार्ड होते. या कार्डावर ‘आय लव्ह यू पप्पा’ असे शब्द लिहले होते. आपल्या मुलाचा मृतदेह पाहताच गणेश कोमकरचा धाय मोकळा झाला. “माझ्या काही चूक नसताना माझ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली,” असे शब्द त्याने अश्रूंनी व्यक्त केले. या वेळी कोमकर कुटुंबियांसह उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आले. (Ayush Komkar Murder News)
आयुषची हत्या ही मागील वर्षी झालेल्या वनराज आंदेकर (Vanraj andekar) खून प्रकरणाचा बदला म्हणून करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. वनराज आंदेकर हत्येप्रकरणात गणेश कोमकर, त्याची पत्नी संजीवनी आणि भाऊ जयंत यांच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहेत. याच रागातून आंदेकर टोळीने आयुषचा बळी घेतला.
Ayush Komkar Murder | पोलिसांची धडक कारवाई :
या हत्येनंतर पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाच्या चर्चांना उधाण आले. मात्र पुणे पोलिसांनी वेगवान कारवाई करून आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली आहे. बुलढाण्यात पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न पोलिसांनी फोल ठरवला. अटक केलेल्यांमध्ये बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातवांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हत्येमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला कोमकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर दुसऱ्या बाजूला आंदेकर टोळीविरोधात कठोर कारवाई करण्याचे पोलिसांनी संकेत दिले आहेत. या प्रकरणामुळे शहरात गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.






