Asia Cup 2025 | आशिया कप क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या उदयोन्मुख खेळाडू दुनिथ वेलालागेवर (Dunith Wellalage) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 18 सप्टेंबरला अबूधाबी येथे श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान वेलालागे यांचे वडील सुरंगा वेलालागे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सामना संपल्यानंतर ही धक्कादायक बातमी समजताच श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये शोककळा पसरली.
या सामन्यात श्रीलंकेने शानदार विजय मिळवून सुपर फोरमध्ये प्रवेश केला. मात्र, सामना संपल्यानंतर वेलालागेला वडिलांच्या निधनाची माहिती देण्यात आली. या बातमीनंतर तो तातडीने मायदेशी रवाना झाला असून, उर्वरित आशिया कप सामन्यांत त्याची उपस्थिती राहील का याबाबत अनिश्चितता आहे.
5 सिक्ससह तब्बल 32 धावा :
अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात दुनिथ वेलालागेने (Dunith Wellalage) शेवटची ओव्हर टाकली होती. अफगाणिस्तानचा अनुभवी ऑलराऊंडर मोहम्मद नबीने (Mohammad Nabi sixes) या षटकात सलग 5 सिक्ससह तब्बल 32 धावा वसूल केल्या. या ओव्हरनंतर लगेचच वेलालागे यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला, असे काही माध्यमांचे म्हणणे आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यावर अधिकृत निवेदन दिलेले नसले तरी, ही घटना क्रिकेट विश्वासाठी धक्कादायक ठरली आहे. एका बाजूला टीमचा विजय, तर दुसऱ्या बाजूला खेळाडूच्या वैयक्तिक जीवनातील मोठं दुःख – असा दुर्दैवी प्रसंग या सामन्यात पाहायला मिळाला.
Asia Cup 2025 | सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल :
सामना संपल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात श्रीलंकेचे प्रशिक्षक सनथ जयसूर्या आणि टीम मॅनेजर दुनिथ वेलालागेला वडिलांच्या निधनाची माहिती देताना दिसतात. हा क्षण पाहून चाहत्यांनाही भावनिक धक्का बसला.
दरम्यान, सामना संपल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद नबी याला या घटनेबद्दल सांगितलं, तेव्हा तोदेखील आश्चर्यचकित आणि दुःखी झाल्याचं दिसून आलं.






