Ashta Municipal Election | सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषद निवडणुकीनंतर वातावरण तापलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली असताना, मतदानाच्या आकडेवारीत रातोरात बदल झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. या आरोपानंतर स्ट्राँग रूमबाहेर आंदोलन सुरू झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
२ डिसेंबरला मतदान पार पडल्यावर प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत आणि पुढील सकाळी ऑनलाइन जाहीर केलेल्या आकडेवारीत मोठा फरक असल्याचा दावा करण्यात आला. जवळपास दोन हजार मतांची वाढ झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या शहर विकास आघाडीने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्ट्राँग रूमबाहेर आक्रोश; सुरक्षा अपर्याप्त असल्याचा आरोप
आष्ट्यातील ईव्हीएम मशीन विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये तयार केलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. मात्र रात्री जाहीर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत सकाळी जवळपास दोन हजार मतांची वाढ दिसल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला. या तफावतीमुळे कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूमबाहेरच आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान गोंधळ वाढला आणि कार्यकर्त्यांनी “पुरेशी सुरक्षा नाही” असा आरोपही केला.
या प्रकारामुळे नागरिकही मोठ्या प्रमाणात स्ट्राँग रूमजवळ जमा झाले. प्रशासनाच्या आकडेवारीतील फरक आणि स्ट्राँग रूमच्या सुरक्षेवरून निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे राजकीय ताप वाढला असून स्थानिक पातळीवर तणाव वाढताना दिसत आहे.
Ashta Municipal Election | मतदानातील तफावत नेमकी कोणती?
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी प्रशासनाने जाहीर केलेली एकूण मतदार संख्या 30,328 होती. मात्र वॉर्ड क्रमांक 3 मध्ये एकूण मतदार फक्त 1,311 असताना ऑनलाईन आकडेवारीत 4,077 मतदार दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. यातील तब्बल 3,109 मतदारांनी मतदान केल्याचे दाखवल्याने या आकडेवारीवर शंका व्यक्त केली जात आहे. इतर वॉर्डमध्येदेखील अशाच प्रकारचे फरक आढळल्याचे आंदोलक म्हणत आहेत. (Ashta Municipal Election)
यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाने या तफावतीबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. (Sangli voting controversy)
निकालाची तारीख पुढे ढकलली
दरम्यान, आज जाहीर होणारा निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. आता 20 डिसेंबरला काही ठिकाणी मतदान होणार असून सर्व निकाल 21 डिसेंबरला जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे आष्ट्यातील राजकीय घडामोडी पुढील काही दिवसांमध्ये आणखी तापण्याची शक्यता आहे.






