Ashok Chavan | महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेले माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पुन्हा एकदा जोरदार विधान केले आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील काही संवेदनशील अनुभव उघड केले. “मी तब्बल 14 वर्षे वनवासात होतो. मला संपवण्याचा प्रयत्न झाला” असा थेट आरोप करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. (Ashok Chavan Big Claim)
चव्हाण लातूरमधील (Latur) एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस तसेच विरोधकांवर सडकून टीका केली. “लातूरकरांनी धक्का तंत्र वापरत महायुतीच्या उमेदवारांना विजयी केले. सहा पैकी पाच जागा महायुतीकडे गेल्या, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळेच शक्य झाले” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
काँग्रेसवर टीका, भाजपला आश्वासन :
सभेत बोलताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपला भूतकाळ उलगडला. “मी आयुष्यातले 14 वर्षे वनवासात होतो. मला संपवायचा प्रयत्न होत होता. त्यामुळेच मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मोदीजी आणि फडणवीस साहेबांशी चर्चा करूनच मी हा मार्ग स्वीकारला” असे ते म्हणाले. त्याचबरोबर, “जसे मी काँग्रेससाठी प्रयत्न केले तसेच आता भाजपासाठीही करणार” असे आश्वासन त्यांनी दिले. (Ashok Chavan Big Claim)
नांदेड जिल्ह्यातील निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही एकजूट ठेवून नऊच्या नऊ जागा जिंकल्या. जर चांगले उमेदवार दिले, तर जनता नक्की त्यांना निवडून देईल.”
विरोधकांवर जोरदार हल्ला :
चव्हाण यांनी यावेळी विरोधी पक्षावर सुद्धा जोरदार हल्ला केला. “कालच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांची मते फुटली. तुम्ही लोकांना काहीही देऊ शकत नाही. त्यामुळे लोक भाजपसोबत येत आहेत” असे ते म्हणाले. पाशा पटेल आता आमचे मित्र झाले असून, हे बदललेले समीकरण स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा वाढदिवस असल्याचे त्यांनी सभेत उपस्थितांना आठवण करून दिली. “या निमित्ताने मोदीजींचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा” असे आवाहन करत त्यांनी भाषणाची सांगता केली.






