Maharashtra Politics | सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणारी घटना घडणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि पुणे विभाग पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी मुंबईत शरद लाड यांचा पक्षप्रवेश होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती मिळाली आहे. या घडामोडीमुळे सांगलीतील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असून, जयंत पाटील (Jayant Patil) यांचे वर्चस्व मोडण्यासाठी भाजपने आखलेली खेळी यशस्वी ठरेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरदचंद्र पवार गटाला धक्का :
अरुण लाड (Arun Lad) हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महत्वाचे नेते असून ते माजी मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे भाजपने त्यांचा मुलगा शरद लाड यांना आपल्या पक्षाकडे खेचून राजकीय समीकरणं बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विजयादशमी निमित्त सांगलीतील दुर्गामाता दौड झाली होती, त्या दौडमध्ये शरद लाड यांनी उपस्थिती लावली होती, त्यानंतरच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी अधिक जोर धरला.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या एका सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील (Jayant patil) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. त्यामुळे भाजप आणि जयंत पाटील गटातील संघर्ष अधिकच पेटल्याचे दिसून आले.
पुणे पदवीधर मतदारसंघात नवे गणित :
शरद लाड (Sharad Lad) यांचा भाजप प्रवेश हा पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अरुण लाड करत आहेत. मात्र, भाजपने ही जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात आणण्याचा चंग बांधला आहे. गेल्या काही दिवसांपासून पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी सुरू असून, यावरून भाजपची रणनीती स्पष्ट होत आहे.
भाजपने जयंत पाटील यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठे पाऊल टाकले आहे. शरद लाड यांच्या प्रवेशामुळे भाजपला नव्या पिढीतील नेते मिळणार आहेत. यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता दिसत आहे.
शरद लाड यांच्या भाजप प्रवेशामुळे सांगली आणि पुणे विभागातील राजकीय समीकरणं बदलू शकतात. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि जयंत पाटील यांना याचा मोठा फटका बसेल, तर भाजपला स्थानिक पातळीवर मजबुती मिळेल. येत्या ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर सांगलीतील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे आणि या संघर्षाचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होईल.






