आगामी निवडणुकांच्या तोंडावर पुणे भाजपला मोठा धक्का!

On: October 31, 2025 12:39 PM
Raosaheb Danve
---Advertisement---

Pune News | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात मोठी घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून, पक्षाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खोट्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“नाहक बदनामीमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये”

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे (Anup More) यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याकडे सुपूर्द केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्यावर खोटे आरोप करून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. या वैयक्तिक आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये, या भावनेतून आपण पदावरून पायउतार होत असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.

राजीनामा दिला असला तरी आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे मोरे यांनी सांगितले. “माझे कुटुंब गेली ४० वर्षे पक्षाचे प्रामाणिक काम करत आहे. बूथ अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष हा प्रवास पक्षाने टाकलेल्या विश्वासावरच झाला. आमचा परिवार सदैव भाजपसोबतच राहील,” असे त्यांनी नमूद केले. ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर स्वतः’ या तत्त्वावर आपण निष्ठेने कार्य करत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Pune News | निवडणुकांच्या तोंडावर मोठा पेच, नवा चेहरा कोण?

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतराचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडीतील नेते महायुतीत जात असतानाच, महायुतीतील मित्रपक्षांचे पदाधिकारीही भाजपमध्ये दाखल होत आहेत. असे असताना भाजपच्याच एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच हा राजीनामा झाल्याने युवा मोर्चा संघटनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मोरे यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी होती, त्यामुळे आता पक्षाला त्यांच्या जागी पर्यायी आणि सक्षम चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात आणि युवा मोर्चाची धुरा कोणाकडे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title- Anup More Resigns BJP Post

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now