पुण्यातील ‘या’ भागात बिबट्या! परिसरात 30 पिंजऱ्यांचे जाळे

On: November 5, 2025 12:22 PM
Leopard Attack
---Advertisement---

Pune Leopard Attack | पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे. पिंपरखेड परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला असून, तो समोर माणसं दिसताच जोरात डरकाळी फोडताना दिसला. गेल्या दोन दिवसांत एक नरभक्षक बिबट्या ठार करण्यात आला असून, आता दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.

ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. स्थानिक नागरिक आणि वनकर्मचारी घटनास्थळी धावले. हा बिबट्या मादी असल्याचं वनविभागाने पुष्टी केली आहे. 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप होता. त्यामुळे वनविभागाने मोहिमेला वेग देत परिसरात 30 पिंजरे लावले होते. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळालं. (Pune Leopard Attack)

पिंपरखेड परिसरात 30 पिंजऱ्यांचे जाळे : 

पिंपरखेड गावात झालेल्या या घटनेनंतर शिरुर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या चार तालुक्यांमध्ये वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या संपूर्ण पट्ट्यात जवळपास 1400 बिबट्यांचा वावर असल्याचा अंदाज आहे. मानवी वस्त्यांच्या जवळपास बिबटे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांनी या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये या परिसरातील काही बिबट्यांना गुजरातमधील “वनतारा प्रकल्प” आणि इतर वनक्षेत्रात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात बिबट–मानव संघर्ष कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Pune Leopard Attack | नरभक्षक बिबट्याचा अंत आणि परिसरातील तणाव :

गेल्या काही दिवसांपासून या भागात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ होता. या बिबट्याने दोन लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेला ठार केलं होतं. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण होतं. अखेर वनविभागाने शार्प शुटर्सच्या मदतीने मोहीम हाती घेतली. (Pune Leopard Attack)

मंगळवारी रात्री ड्रोनच्या कॅमेऱ्यात हा नरभक्षक बिबट्या दिसला. त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला, मात्र नेम चुकल्याने बिबट्या आक्रमक झाला आणि वनकर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. त्यावेळी एका शुटरने तीन राऊंड फायर केले आणि बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. 13 वर्षीय रोहनचा जीव ज्या ठिकाणी गेला होता, त्यापासून अवघ्या 400 मीटरवर हा बिबट्या ठार करण्यात आला.

News Title: Another Leopard Caught in Pune’s Pimparkhed; Roared Loudly After Seeing People

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now