Pune News | पुण्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने दारूच्या नशेत कार चालवत सहा वाहनांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे (Hemant Iname) याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, तसेच त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नसल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Ranjangoan Police Drink & Drive)
दारूच्या नशेत सहा वाहनांना जोरदार धडक :
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस (Ranjangoan MIDC police station) ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीला गेले होते. पार्टीदरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केले आणि नशेत असतानाच त्यांनी स्वतःची कार चालवली. पुणे-नगर महामार्गावर वेगात कार चालवताना त्यांनी सहा वाहनांना जबर धडक दिली. या घटनेत काही वाहनचालक गंभीर जखमी झाले असून, काही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि रांजणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आरोपी पोलीस स्वतःच पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांच्यावरील कारवाईबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, जर आरोपी सामान्य नागरिक असता तर पोलिसांनी त्वरित अटक केली असती.
दारूच्या नशेत वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून, आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांनी केवळ स्वतःचा नव्हे तर अनेक निरपराध नागरिकांचाही जीव धोक्यात घातला आहे. या घटनेमुळे पोलिस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे की, कायदा अंमलबजावणी करणारे अधिकारीच जर कायदा मोडत असतील, तर सामान्य नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?
Pune News | ग्रामीण पोलिसांवर संशयाची सावली :
रांजणगाव पोलिसांनी या घटनेची केवळ प्राथमिक गुन्हा नोंद केली असून, आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलेली नाही. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, हेमंत इनामे यांची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आलेली नाही. यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. (Ranjangoan Police Drink & Drive)
स्थानिक नागरिकांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अपघातातील जखमी नागरिकांवर उपचार सुरू असून त्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. नागरिकांचा प्रश्न असा आहे की, “सामान्य माणूस असा अपघात घडवला असता तर त्याला तात्काळ अटक झाली असती, मग पोलीस असल्यामुळे विशेष वागणूक का?”
या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कायदा सर्वांसाठी समान असायला हवा, असा नागरिकांचा सूर आहे. आता पाहावे लागेल की, प्रशासन या प्रकरणात खरोखर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करते की पुन्हा एकदा हे प्रकरण दबले जाते.






