Walmik Karad | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात मकोका (MCOCA) अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कराड आणि एका पोलीस अधिकाऱ्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral Audio Clip) झाली होती. त्या अधिकाऱ्याने समोर येऊन तो आवाज आपला नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
आता वाल्मिक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यात तो सायबर विभागातील (Cyber Cell) एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना ऐकू येत आहे. एका कार्यकर्त्याचा विषय सोडून देण्यासाठी कराडने हा फोन केल्याचे संभाषणातून स्पष्ट होते. या क्लिपमध्ये तो कार्यकर्त्यांना उद्देशून, “लई मनावर घ्यायचं नाही, इथे बाप बसलेले आहेत आपण,” असे म्हणताना ऐकू येत आहे.
या नव्या ऑडिओ क्लिपमुळे वाल्मिक कराड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या क्लिपमध्ये तो बीड (Beed) पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी निशिगंधा खुळे (Nishigandha Khule) यांच्याशी बोलत आहे. निशिगंधा खुळे यापूर्वी सायबर सेलमध्ये कार्यरत होत्या, आता त्यांची बदली गेवराई (Gevrai) येथे झाली आहे. संभाषणात, “किरकोळ गुन्हा आहे, द्या सोडून,” असे वाल्मिक कराड म्हणत असल्याचे ऐकू येते. तसेच, संबंधित कार्यकर्त्याला धीर देताना, “इथं बाप बसलेले आहेत आपण,” असा उल्लेखही या ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळणी नाही
या ऑडिओ क्लिपची अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, या क्लिपमुळे वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. पोलिसांना फोन करून हवे तसे करायला लावणे किंवा “आपण बाप आहोत” असे म्हणत दहशत निर्माण करण्याचे काम जिल्ह्यात केले जात असल्याचा आरोप या निमित्ताने पुन्हा एकदा होत आहे.
सध्या वाल्मिक कराड मकोका गुन्ह्यांतर्गत एसआयटीच्या (SIT) कोठडीत आहे. गेल्याच आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन पुन्हा कारागृहात (Jail) पाठवण्यात आले आहे.
कृष्णा आंधळेचा शोध सुरूच
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा (Krushna Andhale) शोध पोलीस घेत आहेत. मात्र, तो अद्यापही फरार असल्याने त्याच्या घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.






