Annu Kapoor | ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांच्यातील एका बहुचर्चित किसिंग सीनवर अखेर मौन सोडले आहे. ‘सात खून माफ’ या चित्रपटातील या सीनमुळे त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती आणि आजही गुगलवर (Google) त्यांचे नाव शोधल्यास याच्या बातम्या समोर येतात. ‘मी प्रियांकाला मुलीसारखे मानायचो,’ असे सांगत त्यांनी यामागील संपूर्ण कहाणी स्पष्ट केली आहे.
मुलाखतीत उलगडला जुना अध्याय :
अन्नू कपूर यांनी अलीकडेच शुभंकर मिश्रा (Shubhankar Mishra) यांच्या पॉडकास्टला एक मुलाखत दिली. यावेळी, मुलाखतकाराने त्यांना विचारले की, “तुमचं आणि प्रियांकाचं नाव अनेकदा जोडलं जातं. गुगलवर ‘अन्नू कपूर’ असं सर्च केल्यावर तुमच्या आणि प्रियांकाच्या किसिंग सीनच्या बातम्या येतात. याबद्दल काय सांगाल?”
या प्रश्नावर अन्नू कपूर यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, हा सीन २०११ साली प्रदर्शित झालेल्या आणि विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) दिग्दर्शित ‘सात खून माफ’ (Saat Khoon Maaf) या चित्रपटातील होता. या चित्रपटात त्यांनी प्रियांका चोप्रासोबत काम केले होते.
Annu Kapoor | ‘तो एक मीडिया स्टंट होता’ :
या सीनमागील पार्श्वभूमी स्पष्ट करताना अन्नू कपूर म्हणाले, “माझे आणि प्रियांकाचे दिवंगत वडील कर्नल साहेब यांचे खूप चांगले संबंध होते. आम्ही अनेकदा भेटायचो. मी प्रियांकाला माझ्या मुलीसारखे मानायचो. सेटवरही मी तिला ‘बेटा, आपल्याला हा सीन शूट करायचा आहे’ असे म्हणायचो. त्यामुळे अशा परिस्थितीत किसिंग सीन असेल, तर तिला साहजिकच अवघडल्यासारखे वाटणार.”
ते पुढे म्हणाले, “मी स्वतः विशाल भारद्वाजला हा सीन काढून टाकण्यास सांगितले होते. त्यावेळी जो काही वाद झाला, तो एक मीडिया स्टंट होता. मला तर असेही वाटते की, प्रियांकाने स्वतः यावर कधी काहीही टिप्पणी केली नसेल.” ‘सात खून माफ’ प्रदर्शित झाल्यानंतर या सीनवरून झालेल्या वादामुळेच आजही अन्नू कपूर आणि प्रियांका चोप्रा यांचे नाव एकत्र जोडले जाते. दरम्यान, अन्नू कपूर सध्या ‘अंताक्षरी’ या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत.






