Anil Parab | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaiwal) याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याच्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं — “अशा मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे.”
अनिल परब म्हणाले, “सचिन घायवळ हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे आहेत. अशा व्यक्तीला शस्त्र परवाना देणं म्हणजे राज्य सरकारने गुंडगिरीला अधिकृत परवानगी दिली आहे. पोलिसांनी नकारात्मक अहवाल दिला असतानाही योगेश कदम यांनी परवाना मंजूर केला — हे सरकारचं नाक कापणारा निर्णय आहे.”
नियम डावलून घेतला निर्णय :
अनिल परब (Anil Parab) यांनी संपूर्ण प्रकरणाची “क्रोनोलॉजी” उलगडून सांगितली. त्यांनी म्हटलं, “शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्जदारावर सखोल चौकशी होते. स्थानिक पोलिस त्याची पार्श्वभूमी, गुन्हे, आणि जीवाला धोका आहे का हे तपासतात. या चौकशीत पुणे पोलिसांनी सचिन घायवळला परवाना नाकारला. पण त्याने गृहराज्यमंत्री कदम यांच्याकडे अपील केलं. पोलिसांनी सुनावणीत आपली बाजू स्पष्ट मांडली, पण कदम यांनी ती बाजू बाजूला ठेवली.”
कदम यांनी सांगितलं होतं की, “सचिन घायवळ हा बांधकाम व्यवसायिक आहे, त्याला दररोज मोठ्या रकमेची देवाणघेवाण करावी लागते. त्यामुळे त्याला शस्त्र बाळगणं आवश्यक आहे.” परंतु परब यांच्या मते, “हा तर्कच हास्यास्पद आहे. समाजातील स्थान आणि विश्वासार्हता पाहून परवाना दिला जातो. गुंडाला दिलेला परवाना म्हणजे पोलिसांच्या मेहनतीला तडा देणं आहे.”
Anil Parab | “आईच्या नावाने डान्सबार, गुंडांना परवाना – हे सरकार कुठे चाललंय?” :
अनिल परब यांनी थेट शब्दांत सरकारवर हल्ला करताना म्हटलं, “राज्याचे मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवत आहेत, गँगस्टर लोकांना पोसत आहेत आणि गुंडांना शस्त्र परवाने देत आहेत. हे मंत्री दररोज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या अडचणी काय आहेत की ते अशा मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत?”
परब यांनी पुढे सांगितलं, “मी मुख्यमंत्री यांना भेटून योगेश कदमांच्या हकालपट्टीची मागणी करणार आहे. मी लोकायुक्तांकडे आणि कोर्टातही जाणार आहे. पण आधी मुख्यमंत्र्यांना संधी देणार आहे. शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे.”
योगेश कदमांचं स्पष्टीकरण — “सुनावणीच्या वेळी गुन्हे प्रलंबित नव्हते” :
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं, “सचिन घायवळ यांच्या प्रकरणात सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले होते. त्यामुळे नियमांनुसार शस्त्र परवाना देण्यात आला.”
कदम यांनी पुढे म्हटलं की, “सद्य प्रकरणाशी इतर प्रकरणांची तुलना करणं चुकीचं आहे. माझी कारवाई पूर्णपणे नियमानुसार आहे आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत.”






